अकोला दिव्य न्यूज : शिवसेना ठाकरे गटाचे अकोला जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली असून दातकर यांनी १६० मी.मी.चा पाईप गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीला अवैधरीत्या जोडलेले अवैध कनेक्शन अखेर तोडून बंद करण्यात आले.पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी अकोटचे जलप्रदाय विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप गोपाल दातकर वर करण्यात आला होता. तर गोपाल दातकर यांनी २०१० पासून ४,९६,३१२ रुपयाचे पाणी चोरले असल्याचा आरोप त्यांच्या हिंगणी गावातील सरपंचांनी केला आहे.

दातकर यांनी ही पाण्याची लाईन सुरु करुन स्वतःच्या घरात पाण्याचा वापर केला असल्याचं आरोप होत आहे.या अवैध पाणीचोरी बाबत सरपंच यांनी याआधी जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली होती. तर तत्कालीन कार्यकारी अभियंता व उपअभियंता स्थळपाहणी करिता आले असता अवैध नळ कनेक्शन निदर्शनास आले होते मात्र गोपाल दातकर यांनी अरेरावी करुन सर्वाना तेव्हा हाकलून लावले होते असा आरोप सरपंचांनी केला आहे.

पाण्याच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांशी वाद, अॅट्रोसिटीचा गुन्हा
अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अकोट येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या विरोधात अट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी आपल्या सर्कलमधील अंदाजे ५० लाखांच्या कामांबाबत चौकशी केली. ‘त्यातून ५ लाख देण्याची व्यवस्था करावी’, अशी मागणी केली.

मात्र, इंगळे यांनी याला स्पष्ट नकार दिला. नकार मिळताच, दातकर यांनी धमकी देत जातिवाचक शिवीगाळ केली व “तुमच्या सर्कलमध्ये पाणी मिळू नये” असा मुद्दा उपस्थित केला. हा संवाद इंगळे यांनी स्वतःच्या मोबाइलमध्ये अर्धवट स्वरूपात रेकॉर्ड केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार १ एप्रिल रोजी अकोट शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यावरून गोपाल रामराव दातकर यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
