अकोला दिव्य न्यूज : दरवर्षी १० एप्रिल हा दिवस भू मापन दिन म्हणून साजरा केल्या जातो. पण १० एप्रिलला महावीर जयंतीची शासकीय सुट्टी असल्याने अकोला भूमिअभिलेख विभागातील भू मापन दिन आज बुधवार दिनांक ९ एप्रिलला अमरावती विभाग भूमिअभिलेख उपसंचालक यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला. भूमी अभिलेख कार्यालयात केल्या जात असलेल्या कामाची व भूमिअभिलेख विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. सकाळी ११ ते २.३० वाजे पर्यंत राबविण्यात आलेल्या या शिबीराचा जवळपास ३०० नागरिकांनी लाभ घेतला.

अकोला जिल्हा भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक भारती खंडेलवाल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे साजरा करण्यात आल्यानंतर उद्या गुरुवार १० एप्रिलला स्थानिक खंडेलवाल लॉन्स येथे सकाळी ११ ते २ या कालावधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

अकोला जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाला लोकाभिमुख करुन कामकाजाचे आधुनिकीकरण करण्यासाठी कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शनासाठी उद्या गुरुवार १० एप्रिलला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

अकोला जिल्हा भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक भारती खंडेलवाल यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या शिबिरात पातूर येथील ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाचे संचालक डॉ.सादीक शेख यांच्या नेतृत्वात डॉक्टरांची चमू अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जुजबी तपासणी करून यावर योग्य औषधोपचार सांगणार आहेत. अकोला येथील प्रसिध्द मानसोपचारतज्ञ डॉ.अनूप राठी यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताणतणावाचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करणार आहेत.

सदर कार्यक्रमात भूमिअभिलेख विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्नेह मिलन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.