अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील रहिवासी व व्यावसायिक रमण रामचंद्र चांडक यांचा आज मंगळवार ८ एप्रिलला सकाळच्या सुमारास एका शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हा खून असल्याचे निष्पन्न करीत संशयावरून एकाला ताब्यात घेतले आहे. अलिकडे चांडक यांनी शेत जमीन व रियल इस्टेट व्यवसाय सुरू केला असून, यामध्ये शेतजमीनीचा ताबा किंवा आर्थिक देवाणघेवाणची झालर आहे. परंतु प्रत्यक्षात या हत्येमागे मोठे धेंड असल्याची चर्चा सुरू आहे.

सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत असलेल्या अकोट पोपटखेड मार्गावर एका शेतशिवारालगत जनावरांच्या हाडावर प्रक्रिया करणाऱ्या मात्र बंद अवस्थेतील कारखान्याच्या इमारतीमध्ये आज सकाळी लोकांना मृतदेह आढळून आल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. सदरहू व्यक्तीची आत्महत्या की खून या चर्चा परिसरात रंगलेल्या असतानाच अकोट ग्रामीणच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळ पोलिसांना दोन मोबाईल आढळले. मृताच्या अंगावरील कपड्यांची झाडाझडती घेतली असता, सदर मृतदेह हा अकोट तालुक्यातील पणज येथील निवासी आणि सद्यस्थितीत अकोला येथील गीता नगर भागात वास्तव्यास असलेले रमण चांडक यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी घटनास्थळचा पंचनामा करून मृतदेह अकोट येथील पोलिस ठाण्यात पाठविण्यात आला. प्रथमदर्शनीच खूनच झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मोठ्या आर्थिक देवाण घेवाणीतून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविल्या जात असून संशयाच्या आधारावर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी अकोट ग्रामीण रुग्णालयात करुन शवविच्छेदन करण्यात आले आहे.

अकोट तालुक्यातील पणज या गावाचे मुळ रहिवासी रमण चांडक हे गती इन्शुरन्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेसचे संस्थापकीय संचालक असून काही वर्षांपासून ते अकोला येथे वास्तव्यास आहेत. अलिकडच्या काळात त्यांनी पोपटखेड भागात शेतजमीनसोबत रियल इस्टेट मध्ये कामकाज सुरू केले असल्याची माहिती आहे. तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीची एकुणच प्रकृती बघता या घटने मागचा बोलविता धनी वेगळाच असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून तपासांती नेमकं कारण स्पष्ट होईल.