अकोला दिव्य न्यूज : स्वतःच्या चार महिन्याच्या चिमुकलीसमोरच पत्नीचा गळा दाबून हत्या करुन स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कार्टी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. घरगुती वादातून पत्नीची हत्या करून पतीने स्वतः आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

मिळालेली माहिती अशी, कार्टी या गावातील युवराज लक्ष्मण शेरे (वय-३१) तर पत्नीचे नाव रुपाली युवराज शेरे (वय-२५) अशी या पती पत्नीची नावे आहेत. गेल्या काही दिवसापासून पती युवराज शेरे हा कोणत्या तरी तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे. याच तणावाखाली पत्नीसोबत वाद सुरू होते. यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

युवराज शेरे हा पत्नी ,आई, वडील,भाऊ, भावजय लहान मुलीसह कोर्टी येथील शेरे वस्तीमध्ये राहत होता. हत्या झाली त्यावेळी पती पत्नी हे दोघेच घरी होते. आधी पत्नीची गाळा दाबून हत्या केली, त्यानंतर स्वत: घराच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर बाहेर गेलेले कुटुंबीय घरात आल्यानंतर त्यांना ४ महिन्याची चिमुकली रडत असल्याची दिसली.

यावेळी वडिलांनी पाहिले तर सून एका कोपऱ्यात निपचित पडल्याचे दिसले. पुढे युवराजने एका अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आले. तेव्हा वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर वडिलांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी तपासणी करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
