Monday, April 7, 2025
HomeUncategorizedसत्तेची मस्ती ! कृषिमंत्र्यांची हकालपट्टी करा ; कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान

सत्तेची मस्ती ! कृषिमंत्र्यांची हकालपट्टी करा ; कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट सात बारा कोरा करण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करु, असं जाहीर आश्वासन दिले होते. सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चकार शब्दही काढला नाही.

सत्ताधारी भाजपाचे कर्णधार फडणवीस यांनी निवडलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मात्र सातत्याने बळीराजाची मानखंडना करू लागले आहेत. पुन्हा एकदा शेतकऱ्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करत कर्जमाफीबाबत मोठे वादग्रस्त विधान केले.

यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चांगले अडचणीत आले असून विरोधकांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेनेसह (ठाकरे) डाव्या पक्षांनी कोकाटेंविरोधात आघाडी उघडली.

कोकाटे नेमके काय म्हणाले? अजित पवारांच्या कर्जमाफीबाबत विधानाचा संदर्भ देत नाशिकमध्ये एका शेतकऱ्याने कर्जमाफी मिळेल का, असा प्रश्न कोकाटे यांना विचारला.त्यावर कृषीमंत्र्यांनी त्या शेतकऱ्यालाच सुनावल्याचे दिसले. कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्याचे तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का? पीक विम्याचे पैसे पाहिजे… मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा’ असे ते म्हणाले होते.

‘कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी लग्नांमध्ये उधळपट्टी करतात’ अशा आशयाचे कोकाटे यांचे विधान चर्चेत आहे. यावरून शनिवारी महाविकास आघाडीने त्यांना लक्ष्य करत मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. ‘‘बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. त्याचा अपमान करण्याची एकही संधी महायुती सरकार सोडत नाही. कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत,’’ असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

तर माणिकराव कोकाटे हे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झाले आहेत, अशी टीका शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केली. कृषिमंत्री किती असंवेदनशील आहेत, हेच सिद्ध होते, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. अजित नवले यांनी केली.

काही दिवसांपूर्वी कोकाटे यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली होती. अशा उथळ मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. ते अद्याप पाळलेले नाही. कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, असे सरकार म्हणते. त्यात कर्जमाफीवरून कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना प्रश्न म्हणजे ‘चोर तो चोर आणि वरून शिरजोर’ असा प्रकार आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!