अकोला दिव्य न्यूज : संपूर्ण देशाचा कारभार एक हाती देणारे अमेरीकेतील मतदार/लोक अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची देश चालविण्याची पद्धत आणि त्यांच्या धोरणांविरुद्ध संतापले आणि लोकशाही मार्गाने आपला राग व्यक्त करण्यासाठी हजारोंच्या संखेने हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरले होते. तर लोकशाही मार्गाने लोकांनी केलेलं आंदोलन दडपण्यासाठी ट्रम्प सरकारनेही कुठल्याही कारवाईचा बडगा उगारला नाही.

संतप्त लोकांनी देशभर विविध ठिकाणी निदर्शने केली. विशेष म्हणजे लोकांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ‘हॅन्ड्स ऑफ‘ करीत आपला रोष व्यक्त केला. महत्वाचे म्हणजे, हे अमेरिकेतील विरोधकांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन असल्याचे बोलले जात आहे.

50 राज्यांमध्ये 1200 हून अधिक ठिकाणी ‘हॅन्ड्स ऑफ‘ : अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये 1200 हून अधिक ठिकाणी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्या अमेरिकेसंदर्भातील धोरणांविरोधात हे ‘हॅन्ड्स ऑफ’ आंदोनल अथवा निदर्शन करण्यात आले. या निदर्शनात 150 हून अधिक संघटनांनी भाग घेतला होता.


यात, सिव्हिल राइट्स ऑर्गनायझेशन्स, लेबर युनियन, LGBTQ+ चे वकील, निवडणूक कार्यकर्त्यांसह अनेक दिग्गजांचा समावेश होता. अमेरिकेतील रिपब्लिकन राजवटीच्या सुरुवातीच्या आठवड्यांत आलेल्या अपयशानंतर करण्यात आलेले हे निदर्शन शांततेत पार पडले.

अनेक राज्यांच्या राजधान्यांपर्यंत हजारो निदर्शक रस्त्यावर –
अमेरिकेच्या मिडटाउन मॅनहॅटनपासून अँकोरेज, अलास्का, तसेच अनेक राज्यांच्या राजधान्यांपर्यंत हजारो निदर्शक हातात पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरले होते. यावेळी काढण्यात आलेल्या सर्वच रॅल्यांमधून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि DOGE प्रमुख एलोन मस्क यांच्यावर, संघीय संस्थांमधून हजारो लोकांना काढून टाकणे, अर्थव्यवस्था, इमिग्रेशन आणि मानवी हक्क आदी मुद्द्यावरून जोरदार टीका करण्यात आली.

पर्शिंग स्क्वेअर ते सिटी हॉलपर्यंत रॅली…
अमेरिकेतील पोर्टलँड, ओरेगॉन आणि लॉस एंजेलिसमध्येही हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले आणि ट्रम्प सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली, दरम्यान, पर्शिंग स्क्वेअर ते सिटी हॉलपर्यंत रॅलीही काढल्या.
