अकोला दिव्य न्यूज : Shri Ram Navami puja vidhi : रामनवमीला रामाची पूजा नेमकी कशी करावी, रामाचा पाळणा हलवतात का, कोणते पाठ यावेळी करायचे कोणते मंत्र म्हणायचे हे अनेकांना माहित नसते. आज आपण पाहुयात रामनवमीला प्रभू श्रीरामाची कृपा मिळवण्यासाठी कशा प्रकारे पूजा विधी केली जाते.

चैत्र शुक्ल नवमीला प्रभू श्री राम यांचा जन्म झाला. तो दिवस हिंदू पंचांगानुसार रामनवमी म्हणून साजरा केला जातो. दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. यावेळी रामनवमीला मंदिरांमध्ये किंवा घरात देखील रामाचा पाळणा हलवला जातो. प्रभू श्री रामाचा जन्म कसा साजरा करायचा हा प्रश्न अनेकांना पडतो त्यामुळे आज आपण पाहुयात रामनवमीला रामाची सेवा, पूजा विधी कशी करायची. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री रामाला कसे प्रसन्न करायचे ज्यामुळे त्यांची कृपा होईल.

पूजा विधी (उंबऱ्याचे पूजन )
रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून सर्वात आधी आपल्या घराचा उंबरा पाण्याने स्वच्छ करून घ्यावा. उंबऱ्याला हळदीने लेपावे. त्यानंतर उंबऱ्यापाशी रांगोळीने लक्ष्मीची पावले व स्वस्तिक काढावे. त्यावर हळदी कुंकू वहावे. यादिवशी प्रभू रामांना आपण आपल्या घरी बोलवत असल्याने पूजेची तयारी आपल्या दारापासून करावी. दारात रांगोळी घालून फुलांची सजावट करून श्री रामांच्या स्वागताची तयारी करावी.

घरातील राम मूर्तीचे पूजन
आपल्या घरातील मंदिरात रामाचा जो फोटो किंवा मूर्ती असेल त्याचे पूजन रामनवमीला आपण करावे. यादिवशी सकाळी रामाची मूर्ती किंवा कृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करावा. त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून ती चौरंगावर लाल वस्त्र अंथरून तांदुळाच्या राशेत ठेवावी. मूर्तीला अष्टगंध लावावे. त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावावी. फुले आणि हार देवाला अर्पण करावा. तसेच खीर किंवा गोडाचा नैवेद्य दाखवावा. पूजा करताना रामाच्या नावाचा जप सुरु ठेवावा. यामुळे वातावरण आणि मन प्रसन्न राहते. आपली पूजा देवा पर्यंत पोहचते. घरात मूर्ती नसेल तर रामाच्या फोटोची देखील पूजा करू शकता.

रामनवमी पूजेचा मुहूर्त आणि तिथी
रामाचा जन्म हा सूर्य डोक्यावर असताना दुपारी १२वाजून ३९ मिनिटांनी झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. त्यामुळे बरोबर १२.३९ वाजता रामाचा पाळणा हलवला जातो. अनेक मंदिरांमध्ये या मुहूर्तावर रामजन्मोत्सव साजरा करतात. तसेच तुम्ही घरी देखील रामाची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा जोजवू शकता. रामनवमीचा मुहूर्त ६ एप्रिल रविवारी, सकाळी ११ वाजून १ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत असेल. यावेळेत तुम्ही पूजा करू शकता.

कोणते स्तोत्र म्हणावे
रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्र नक्की म्हणावे. रामरक्षा स्तोत्र हे यावेळी किमान १ ते ९ ओव्या ११ वेळा म्हणाव्यात यामुळे प्रभू रामाची कृपा होते. तसेच रामचरितमानसचा देखील पाठ केला जातो. रामस्तुतीचा पाठ १ ते १०० आपल्या भक्तिभावानुसार तुम्ही करू शकता. रामायणातील पाठ यावेळी केले जातात. तसेच घरात सुंदरकांडचा पाठ सुद्धा करतात. यामुळे प्रभू श्रीराम निश्चित प्रसन्न होतात.

कोणते मंत्र म्हणावे
‘राम’ या नामात अतिशय शक्ती आहे. राम नाम जर आपण घेतले तर जीवन सार्थक होते असे आपल्या शास्त्रात, धर्मात सांगितले आहे. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी इतर कोणती सेवा करायला जमली नाही तर चालेल मात्र राम नामाचा जप तुम्ही केला तर तुमची पूजा भक्तिभाव देव नक्कीच स्वीकारतो. हातात जपमाळ घेऊन १०८ वेळा किंवा ११ माळा तरी रामनामाचा जप यादिवशी करावा. तसेच राम नाम लिहून देखील तुम्ही लिखित जप करू शकता. याशिवाय “ॐ राम रामाय नमः”, “श्री राम जय राम जय जय राम”, “रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः”, श्री राम रामेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥ हे जप देखील करू शकता.
