अकोला दिव्य न्यूज : काही व्यक्तिमत्त्व केवळ जन्माला येत नाहीत, तर आपले विचार, कार्य आणि समाजासाठीचे समर्पण यांनी अजरामर होतात. असेच एक म्हणजे स्व. अंबरीश कवीश्वर. निर्भीड पत्रकारिता, समाजप्रबोधन आणि सत्याच्या शोधाची धग त्यांनी आपल्या लेखणीतून जपली. त्यांच्या अकाली जाण्याने अकोल्याच्या पत्रकारिता विश्वात पोकळी निर्माण झाली. मात्र, त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी सुरु केलेला ‘स्व. अंबरीश कवीश्वर युवा पत्रकार पुरस्कार’ यंदा आठव्यांदा प्रदान केला जाणार आहे.

अंबरीश महेंद्र कवीश्वर यांनी ‘दैनिक भास्कर’ मध्ये उपसंपादक म्हणून काही वर्ष काम केले. नंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. शिवस्पर्श नावाचे स्वतःचे साप्ताहिक सुरू करून, पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांचे वडील महेंद्र कवीश्वर यांच्याकडून त्यांना पत्रकारितेचा वारसा आणि संघ संस्कारांचे बाळकडू मिळाले. अंबरीश म्हणजे कार्यकर्त्यांचा नेता नव्हे, तर मार्गदर्शक होते. पत्रकारिता आणि सामाजिक कार्यामधून त्यांनी असंख्य लोकांना जोडले. त्यांच्या स्मरणार्थ ‘स्व. अंबरीश कवीश्वर युवा पत्रकारिता पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे.
युवा पत्रकार पुरस्कार सोहळा – 2025
यंदाचा पुरस्कार सोहळा उद्या गुरुवार ३ एप्रिल २०२५ रोजी बिर्ला राम मंदिर येथे संध्याकाळी ६.३० वाजता संपन्न होणार आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि समर्पणाची भावना जपणाऱ्या युवा पत्रकाराला हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पुरस्काराचे स्वरूप रुपये ३१०० रोख आणि स्मृतिचिन्ह असे आहे. नव्या पिढीतील पत्रकारांसाठी हा पुरस्कार एक प्रेरणादायी संधी आहे.
यापूर्वी मोहन शेळके, शंतनु राऊत, आशिष गावडे,करुणा भांडारकर, संतोष ऐलकर, नितीन गव्हाळे आणि मनोज भिवगडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर पत्रकारितेतील निष्ठेचा आणि समाजप्रबोधनाच्या जबाबदारीचा गौरव आहे. निर्भीडपणे समाजातील प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांसाठी हा एक प्रेरणादायी क्षण आहे. अकोल्यातील पत्रकार, नागरिक आणि समाजप्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित राहून स्व. अंबरीश कवीश्वर यांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.