अकोला दिव्य न्यूज : आजपासून देशात आर्थिक वर्ष २०२५-२६ ला सुरुवात झाली. या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून ९०० हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किमतीत वाढ झाली आहे. नॅशनल फार्मास्यूटिकल्स प्रायसिंग अथॉरिटीने (NPPA) या सर्व ९०० हून अधिक आवश्यक औषधांच्या किमतीत १.७४ टक्क्यांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. किंमत वाढलेल्या औषधांच्या यादीत गंभीर संसर्ग, हृदयविकार, मधुमेह आदी आजारांशी संबंधित औषधांचाही समावेश आहे.

औषधांच्या किमतीतील वाढीसंदर्भात केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत लेखी उत्तर दिले. आपल्या लेखी उत्तरात त्या म्हणाल्या, “ड्रग्स (प्राइस कंट्रोल) ऑर्डर, 2013 (DPCO, 2013) च्या तरतुदींनुसार, सर्व अनुसूचित औषधांच्या किमतीत होलसेल प्राइस इंडेक्स (WPI) (ऑल कमोडिटीज) च्या आधारावर दरवर्षी संशोधन केले जाते. तसेच, आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी अनुसूचित औषधांच्या किमतीत WPI च्या वार्षिक बदलाच्या आधारे, १ एप्रिल, २०२४ रोजी ०.००५५१ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.
त्या म्हणाल्या, “NPPA ने DPCO च्या परिच्छेद 2(1)(u) मधील व्याख्येनुसार, नवीन औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत.
या औषधांच्या किमती वाढल्या –
• मधुमेहाच्या औषधांची किंमत (डॅपाग्लिफ्लोझिन + मेटफॉर्मिन + हायड्रोक्लोराइड + ग्लिमापीराइड) प्रति टॅब्लेट सुमारे १२.७४ रुपये निश्चित करण्यात आली आहे.
• फायनान्शियल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अॅझिथ्रोमायसिन या अँटीबायोटिकच्या २५० मिलीग्राम आणि ५०० मिलीग्रामची किंमत अनुक्रमे ११.८७ रुपये आणि २३.९८ रुपये प्रति टॅब्लेट निश्चित करण्यात आली आहे.
• अॅमोक्सिसिलिन आणि क्लॅव्हुलेनिक अॅसिड असलेल्या ड्राय सिरपची किंमत प्रति मिलीलीटर २.०९ रुपये निश्चित करण्यात आली आहे.
• डायक्लोफेनॅकची (पेनकिलर) कमाल किंमत प्रति टॅब्लेट २.०९ रुपये निश्चित करण्यात आली आहे.
• इब्रुप्रोफेन (पेनकिलर) – २०० मिग्रॅ प्रति टॅबलेट ०.७२ रुपये. तर ४०० मिग्रॅ प्रति टॅबलेट १.२२ रुपये.
• अॅसायक्लोव्हिर (अँटीव्हायरल) – २०० मिग्रॅ प्रति टॅबलेट ७.७४ रुपये,४०० मिग्रॅ: प्रति टॅबलेट १३.९० रुपये
• हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (अँटीमलेरियल) – २०० मिग्रॅ प्रति टॅबलेट ६.४७ रुपये, ४०० मिग्रॅ प्रति टॅब्लेट १४.०४ रुपये निश्चित करण्यात आले आहे.