अकोला दिव्य न्यूज : प्रभू रामाचे चरित्र आदर्श आणि त्यागाचे प्रतिक असून या चरित्राची व्याप्ती अमर्याद आहे.भक्तीमार्गाहून मुक्तीमार्गाची ओढ लागलेल्या वृद्धांसाठीच रामायण आहे. असा गैरसमज कोणीही करू नये. संस्कारक्षम वयात योग्य संस्कारासाठी, व्यवस्थापनाचे धडे गिरविणाऱ्यांसाठी, सामाजिक ऐक्य व एकोपा कसा वृद्धिंगत करावे हे समजण्यासाठी म्हणजे सर्वांसाठीच रामायण उपयुक्त आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीत श्रीरामचंद्र यांचं जीवन स्फूर्तीदायक व अनुकरणीय आहे.असे प्रतिपादन डॉ.भूषण फडके यांनी केले.

जठारपेठ येथील बिर्ला मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून डॉ.भूषण फडके यांच्या वाणीत संगीतमय श्रीरामकथा निरूपणाचे आयोजन निलेश देव मित्र मंडळाने केले आहे.आज रामायणातील बालकाण्डचे निरुपण करताना ते बोलत होते. यावेळी फडके यांनी वाल्मिकीकडून रामचरित्र लेखनास प्रारंभ, लव-कुशकडून अयोध्येत रामचरित्र गायन,श्रावण कुमारच्या आईवडीलांनी दिलेला शाप, पुत्रकामेष्टी यज्ञ, श्रीराम जन्म, त्राटिका वध या घटनांची मांडणी केली. वशिष्ठ ऋषींचा उदाहरणातून सकारात्मकता आणि एखादा शाप वरदान कसा होऊ शकतो. यांचं सुंदर निरुपण करण्यात आले. त्रिकालदृष्ट्या महाकवी वाल्मिकी ऋषींनी अनेक जीवनमुल्यांची शिकवण रामायणातून दिली आहे. असे प्रतिपादन डॉ.फडके यांनी केले.
त्राटिका वधावर बोलताना डॉ. फडके म्हणाले “स्त्री म्हणून या राक्षशिणीस कसे मारावे? असा प्रश्न श्रीरामास पडतो पण ही राक्षशिण नीतिभ्रष्ट आहे. एखाद्या चांगल्या कामात संकटे येतातच त्राटका असेच संकट आहे असे संकट समूळ नष्ट केल्याशिवाय ध्येयापर्यंत पोहचू शकत नाही. राष्ट्ररक्षण हे श्रीरामाचे ध्येय आहे. त्या ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करणे क्रमप्राप्त आहे म्हणून विश्वामित्र रामास त्राटिकारुपी संकटाला दूर करण्याचा म्हणजेच तिचा वध करण्याची आज्ञा देतात. योग्य मार्गदर्शन करून कार्यपूर्ती कशी करावी याचा योग्य वस्तुपाठ विश्वामित्र ऋषींनी दाखवून दिले आहे.
कार्यक्रमात समायोचीत गीते सदर करण्यात आली. देवाशिष फडके यांनी लव-कुश रामायण गाती, राम जन्माला ग सखी, चला राघवा चला तर निखिल देशमुख यांनी मनु निर्मिती अयोध्या नगरी, दशरथा घे हे पसायसदान, जेष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, तर वैशाली फडके यांनी सावळा ग रामचंद्र, तुज मागतो मी आता, रामजन्माचा पाळणा, श्रीराम गजर ही गीते सादर केलीत. हार्दिक दुबे आणि सूमत तरालकर यांनी साथ सांगत केली.
रश्मी देव यांनी कलावन्तांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्तविक दिलीप देशपांडे यांनी केले. निलेश देव, अँड आशिष देशमुख, जयंतराव सरदेशपांडे, रामदास काकणे, अजय शास्त्री, राजेंद्र गुन्नलवार, गणेश मैराळ, राजु कनोजीया, रामहरी डांगे, प्रकाश जोशी,सुनिल जोशी, रामभाऊ उमरेकर, नरेंद्र परदेशी, विजय वाघ,रश्मी देव, सीमा सरदेशपांडे, अवंतीका मैराळ, प्रणाली शास्ती, मेघा देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली. निलेश देव मित्र मंडळाच्या आयोजनाने रसिक भक्तिरसात न्हाऊन निघालेत.
