अकोला दिव्य न्यूज : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना केज पोलिसांनी साडे तीन तास बसवून ठेवलं होतं. पोलिसांना घटनेचं गांभीर्य माहीत असूनही त्यांनी निष्काळजीपणा दाखवला. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर देशमुखांचा जीव वाचला असता.

९ डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं. टोलनाक्यावर त्यांची कार अडवण्यात आली. त्यानंतर देशमुखांना कारमधून बाहेर काढून मारहाण करण्यात आली. यानंतर आरोपींनी त्यांना स्वत:च्या कारमध्ये टाकून अज्ञातस्थळी नेलं. देशमुखांचं अपहरण झालं, त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीनं सगळा प्रकार देशमुखांचे बंधू धनंजय यांना सांगितला. अपहरण करताना आरोपींनी प्रत्यक्षदर्शीच्या गळ्यावर कोयता ठेवला होता. त्यामुळे जीवाच्या भीतीनं तो शांत बसला.

देशमुखांचं अपहरण होताच प्रत्यक्षदर्शीनं धनंजय यांच्याकडे जात सगळा प्रकार कथन केला. यानंतर धनंजय यांनी प्रत्यक्षदर्शीला सोबत घेऊन तातडीनं केज पोलीस ठाणं गाठलं. त्यावेळी नवा कायदा असल्यानं पुस्तकात पाहून कलमं लिहावी लागतात, असं म्हणत पोलिसांनी धनंजय देशमुख आणि त्यांच्यासोबत आलेल्या प्रत्यक्षदर्शीला तब्बल साडे तीन तास बसवून ठेवलं. या कालावधीत देशमुखांचा शोध घेतला असता, तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता.

धनंजय देशमुखांसह प्रत्यक्षदर्शींनी केज पोलीस ठाणं गाठलं, त्यावेळी तिथे पोलीस निरीक्षक महाजन आणि बनसोडे होते. आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीची आणि त्यावरुन झालेल्या वादाची कल्पना महाजन यांना होती. प्रकरणाचं गांभीर्य माहीत असूनही त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यांनी आरोपींचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या दिशेला आरोपींची स्कॉर्पिओ गेली, त्या दिशेला पोलिसांना शोधही घेतला नाही. देशमुख गंभीर अवस्थेत सापडल्यावर मात्र याच प्रत्यक्षदर्शीची पोलिसांनी सही घेतली. पोलिसांच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
