अकोला दिव्य न्यूज : राजस्थानी समाजातील महिलांसाठी विशेषतः नवविवाहित मुलींसाठी गणगौर अत्यंत महत्त्वाचा सण असून, माहेरी आलेल्या नवविवाहिता आणि महिला एकत्रित येऊन हा सण मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने साजरा करतात. गणगौर सणानिमित्त शहरात मागील 9 दशकांपासून गणगौर व ईसरजी यांची मिरवणूक काढून अखंड पूजेची गौरवशाली परंपरा सुरू ठेवण्याचे कार्य रामदत्त कन्हैयालाल बजाज परिवाराकडून होत आहे. गत 92 वर्षांपासून या कुटुंबाको कुंभार वाडा येथील त्यांच्या प्रतिष्ठानात विधीवत पूजा करून गणगौरची मिरवणूक काढण्यात येते.

दरवर्षी प्रमाणे यंदाही सोमवार चैत्र सुदी तीज 31 मार्च 2025 रोजी रामदत्त कन्हैयालाल बजाज प्रतिष्ठान येथून गणगौर मिरवणूक काढण्यात येणार आहे.

ही मिरवणूक खोलेश्वर येथील संतोषी माता मंदिरात पोहोचल्यानंतर शेकडो महिला गणगौरची पूजा करुन मंगल कामना करतात.यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तेथून पुन्हा मिरवणूक राम दत्त कन्हैयालाल बजाज प्रतिष्ठान येथे पोहोचते आणि तिथे मिरवणूकीचे समापन केले जाते. राम दत्त कन्हैयालाल बजाज परिवाराची पाचवी पिढी या धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे आणि तो यशस्वी करत आहे. या मिरवणुकीत भवानी शंकर खंडेलवाल परिवार, सत्यनारायण बजाज परिवार आणि बनवारीलाल सुनारीवाल यांचेही अमूल्य योगदान आहे.
