अकोला दिव्य न्यूज : उष्णतेच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. देशाच्या अनेक भागात पारा ४० अंशांच्या आसपास पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन होऊ शकतं, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण दररोज किती पाणी प्यावं आणि त्याच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे.

आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, उन्हाळ्यात शरीरातून घामाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडतं, ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. म्हणून पाणी पित राहावं. पाण्याची गरज व्यक्तीनुसार त्यांच्या शरीरानुसार बदलू शकते. परंतु साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात एका व्यक्तीला दिवसाला ८ ग्लास म्हणजे सुमारे ३ ते ३.५ लीटर पाण्याची आवश्यकता असते. डिहायड्रेशन : घामाद्वारे शरीरातून जास्त पाणी बाहेर पडल्यास डिहायड्रेशन होऊ शकतं. त्याची लक्षणं म्हणजे डोकेदुखी, चक्कर येणं, अशक्तपणा आणि जास्त तहान लागणं.
बद्धकोष्ठता आणि पचन समस्या : पाण्याअभावी पचनसंस्थेची गती मंदावते, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. पुरेसे पाणी प्यायल्याने पचनसंस्था चांगली कार्य करते.
हीट स्ट्रोक : उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान नियंत्रणाबाहेर जातं, ज्यामुळे हीट स्ट्रोकचा धोका वाढतो. ही एक गंभीर स्थिती असू शकते, ज्यामध्ये तुम्ही बेशुद्ध देखील होऊ शकता.
त्वचेच्या समस्या : कमी पाणी प्यायल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू शकते. त्यामुळे त्वचेची चमक कमी होते. पाणी त्वचेला हायड्रेटेड आणि चमकदार ठेवण्यास मदत करतं म्हणून पाणी प्या.

जर तुम्ही बराच वेळ बाहेर राहत असाल, जास्त काम करत असाल किंवा खूप व्यायाम केलात तर तुम्हाला जास्त पाणी पिण्याची आवश्यकता आहे. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचा रस देखील घेऊ शकता..