अकोला दिव्य न्यूज : विदर्भ प्रांतस्तरीय ॲग्रीविजन 2025 संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पहिल्या ऐतिहासिक संमेलनाची संकल्पना ‘समृद्ध विदर्भासाठी कृषी परिवर्तन–व्हिजन 2047’अशी असून, विदर्भातील कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि युवकांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे

विदर्भातील कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि युवकांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने अकोला येथील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर येथे ठाकरे ऑडिटोरियमध्ये रविवार 23 मार्च 2025 रोजी आयोजित संमेलनात विदर्भ प्रांतातील 43 विद्यालयांपैकी 40 विद्यालयांमधून सुमारे 400 विद्यार्थी सहभागी होत आहेत.या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भविष्यातील कृषी परिवर्तनाचे नेतृत्व घडविण्याचा मानस आहे.
संमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्घाटन समारंभ:
संमेलनाचा उद्घाटन समारंभ सकाळी 10.30 वाजता संपन्न होणार असून, यावेळी अखिल भारतीय प्रमुख विक्रम फरस्वान हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके, आयोजन समितीचे सचिव गिरीश जिवघाले आणि आयोजन संयोजक चंद्रकांत बोबडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम पाच सत्रांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक सत्र विदर्भातील कृषी विकास, नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शाश्वत कृषी पद्धती यावर केंद्रित आहे.
- रोल मॉडेल सेशन – ज्यामध्ये यशस्वी कृषी उद्योजक आपले अनुभव आणि मार्गदर्शन देतील.
- ड्रॉइंग स्पर्धा – कृषी परिवर्तन व पर्यावरण संवर्धन या विषयावर विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यात येईल.
- क्विझ स्पर्धा – कृषी ज्ञान वाढीस चालना देणारी माहितीपर आणि रोचक प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात येणार आहे.
- विविध चर्चासत्रे व कार्यशाळा – कृषी उद्योग, नैसर्गिक शेती, जैविक उत्पादन या क्षेत्रांमध्ये नव्या संधींवर सखोल चर्चा होईल.
- संमेलनाचे विशेष आकर्षण:
- क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
- विद्यार्थी व युवकांसाठी व्यासपीठ
- नव्या कल्पना व संशोधनाचे सादरीकरण
- पुरस्कार वितरण समारंभ.

संमेलनाचे यशस्वी आयोजन हे विदर्भ प्रांताच्या प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.यावेळी प्रांत उपाध्यक्ष अभाविप प्रा. उमेश कुडमेथे, अग्रिविजन सम्मेलन संयोजक चंद्रकांत बोबडे, अग्रिविजन सम्मेलन सह संयोजक सुहास मोरे यांनी कृषीच्या विद्यार्थ्यांना संमेलनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.