अकोला दिव्य न्यूज : सोने तारण कर्ज योजनेत चक्क नकली सोनं गहाण ठेवून सोने मुल्यांकक (व्हॅल्यूअर) व इतर सहकाऱ्यांनी संगनमत करुन पतसंस्थेची सुमारे ६ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ माजली आहे. अखेर बालाजी नागरी पतसंस्थेमधील या महाघोटाळा प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाच आरोपीमध्ये सोने मूल्यांककसह स्थानिक शाखा सल्लागार आणि अन्य तिघांचा समावेश आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील बालाजी अर्बन को ऑप. क्रेडिट सोसायटी चिखली, या पतसंस्थेच्या साखरखेर्डा येथील शाखेत घोटाळा झाल्याची मागील वर्षी जुलै महिन्यात चर्चा सुरु झाली. पतसंस्थेच्या सोने मूल्यांकक अजिंक्य दिलीप शहाणे याने त्याचे कुटुंबीय व काही सहकाऱ्याच्या नावाने पतसंस्थेत नकली सोने गहाण ठेवून कर्ज काढल्याची कुणकुण पत्रकार संतोष गाडेकर व अस्लम अंजुम यांना लागली. त्यांनी १६ जुलै २०२४ रोजी या गैरप्रकाराची जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था ) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली होती.

या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक यांनी त्याच दिवशी सहायक निबंधक देऊळगावराजा यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. चौकशी अधिकारी जगदाळे यांनी पहीली सुनावणी घेतली. त्यावेळी साखरखेर्डा शाखेतील सोने मुल्यांकक अजिंक्य दिलीप शहाणे यांना चौकशीसाठी बोलवले. शहाणे यांनी आपल्या कबुली जबाबात आपण स्थानिक शाखा सल्लागार राजू प्रभाकर केंधळे यांच्याशी संगनमत करून बनावट सोने असली दर्शवून स्वत:च्या कुटुंबातील व मित्रपरीवातील व्यक्तींच्या नावाने सोने तारण कर्ज प्रकरणे केल्याचे कबुल केले.

त्यानंतर सहायक निबंधक एस. जगदाळे यांनी सोने मूल्यांकक शहाणे यांच्या कबुली जबाबातील इतर कर्जदार राजू प्रभाकर केंधळे, भगवान शहाणे, प्रदीप नामदेव अवचार व गोपाल पाझडे यांना वारंवार नोटीस देवुनही चौकशीसाठी हजर झाले नाही.शेवटी ‘व्हिडिओग्राफर बाजीराव देशमुख, सोने फेरमूल्यांकक सचिन अनंत सराफ तसेच साक्षीदार दत्तात्रय देशमुख आणि अँड.सचिन देशमुख यांच्या समक्ष सोने दागिन्यांची तपासणी व पडताळणी करण्यात आली. त्यावेळी संस्थेत तारण ठेवलेले सोने हे बनावट असल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे सोन्याच्या वजनात ही तफावत असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल गाडेंनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात १४ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. पतसंस्थेचे स्थानिक शाखा सल्लागार राजू प्रभाकर केंधळे, भगवान सुभाष शहाणे, प्रदीप नामदेव अवचार, सोने मूल्यांकक अजिंक्य शहाणे तसेच गोपाल रंगनाथ पाझडे यांनी संगनमत करुन बालाजी अर्बन पतसंस्थेला सुमारे ६ कोटीने फसवले आहे,असे तक्रारीत नमूद होते.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात सदर प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर ठाणेदार गजानन करेवाड यांनी पाच जणांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३८,३३६ (३) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्था मधील हित संबंधाचे संरक्षण अधिनीयम १९९९ चे कलम ०३ गुन्हे दाखल केले. मात्र अद्यापही एकाही आरोपीस अटक करण्यात आली नाही.
