अकोला दिव्य न्यूज : बिहार विधानसभेची निवडणूक या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री यांनी मिथीला येथील सीतामढी या ठिकाणी असलेल्या सीतामाता मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात काय घडलं आहे आपण जाणून घेऊ.

मिथीला ही सीतामातेची नगरी : पुनौरा धाम या ठिकाणी सीतामढीमध्ये सीतामातेचं मंदिर आहे. दरम्यान भाजपाने या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर उपस्थित केला आहे. सीता मातेच्या मंदिर जीर्णोद्धाराचं श्रेय भाजपाने घेऊ नये असं राष्ट्रीय जनता दल या बिहारच्या प्रमुख विरोधी पक्षाने म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपाचा सत्तेतील मित्र पक्ष जनता दल (यू) यांनी मंदिर जिर्णोद्धारासाठी केंद्राने निधी दिला पाहिजे अशी मागणी केली आहे.

अमित शाह यांनी काय वक्तव्य केलं होतं अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या शाश्वत महिला महोत्सव २०२५ या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं होतं की, अयोध्येत आम्ही राम मंदिर बांधलं आहे. आता सीतामातेचं भव्य मंदिर उभारलं जाणं याची आवश्यकता आहे. बिहारच्या सीतामढी या ठिकाणी सीतामातेचं मंदिर उभारलं गेलं पाहिजे. मिथीला ही सीतेची नगरी होती. सीतामाईने प्रभू रामाशी स्वयंवर होईपर्यंतचा काळ या ठिकाणी व्यतित केला आहे. त्यामुळे आई जानकीचं भव्य मंदिर या ठिकाणी उभारणं ही आमची प्राथमिकता आहे. मिथीला नगरीतल्या लोकांनी बिहारच्या या प्रकल्पासाठी एकत्र यावं असं आवाहन मी करतो.

लालूप्रसाद यादव यांची टीका : अमित शाह यांनी सीतामातेचं मंदिर बांधण्याचं श्रेय घेऊन पळून जाऊ नये अशी टीका राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. सीता मातेचं जन्मस्थान असलेल्या पुनौरा या गावातील पुनौरा धाम मंदिराचा जीर्णोद्धार आणि नूतनीकरण प्रकल्प सप्टेंबर २०२३ मध्ये मंजूर कऱण्यात आला होता. त्यावेळी राजद आणि जदयू सत्तेत होते. मात्र नितीश कुमार यांनी पुन्हा भाजप, एनडीएशी हातमिळवणी केली होती. आता बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.

सारिका पासवान यांची टीका : राजदच्या प्रवक्त्या सारिका पासवान म्हणाल्या की बिहारमध्ये जातीय सलोखा कायम ठेवला आहे. त्याचं श्रेय लालूप्रसाद यादव यांना जातं कारण त्यांनी जातीपातीच्या राजकारणाला कायमच विरोध केला जातो. सीतामातेचं प्रतीक आता निवडणुकीच्या तोंडावर कुणी आणू नये असा टोला पासवान यांनी भाजपाला लगावला आहे. तर भाजपाचे प्रवक्ते असित नाथ तिवारी यांनी अमित शाह यांच्या घोषणेचं स्वागत केलं आहे. बिहारमधील एनडीए सरकारने जर सीतामातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर त्याचा आनंदच आहे असंही तिवारी यांनी म्हटलं आहे.

नीरज कुमार यांनी काय म्हटलं आहे ? : सीता मंदिर जीर्णोद्धार प्रकल्प हा राज्य सरकारचा प्रकल्प आहे. आता केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सीता मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धराचा मुद्दा उपस्थित केला आहे. सीतामाता मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केंद्राने निधी द्यावा असं जदयूचे मुख्य प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार नीरज कुमार यांनी म्हटलं आहे.

कॉंग्रेसचीही जोरदार टीका : दरम्यान काँग्रेसचे बिहारचे प्रवक्ते ज्ञानरंजन गुप्ता यांनी म्हटलं आहे की अमित शाह हे जाणीवपूर्वक सीतामातेच्या मंदिराचा मुद्दा उपस्थित करत आहेत. सीता मातेचं मंदिर हा निवडणूक लढवण्याचा मुद्दा नाही. केंद्र सरकारचा या प्रकल्पाशी संबंध नाही. मंदिरापेक्षा बिहारचे ते प्रश्न सोडवा जे आवश्यक आहेत असाही टोला गुप्ता यांनी लगावला.
