अकोला दिव्य न्यूज : Heatwave Alert : राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा चटका असह्य झाला असून उद्या शुक्रवार १४ आणि शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भासह संपूर्ण राज्यात तापमान झपाट्याने वाढत असून, पुढील काही दिवस उष्णतेचा कहर जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.आज राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे होते.अकोल्यात ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील ब्रम्हपुरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथे ३९.४ अंश सेल्सिअस तापमान होते. सांगली येथेही ३९ अंश सेल्सिअस तर जळगाव, जेऊर, कोल्हापूर, चंद्रपूर जिल्ह्यात ३८ अंशपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली होती.

राज्यातील बहुतांशी भागात गेल्या २४ तासांमध्ये तापमानात मोठी वाढ दिसून आली. विदर्भातील अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई महानगर प्रदेशात धडकलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे बहुतेक ठिकाणचे तापमान ३८ ते ४० अंश नोंदविण्यात आले. मुंबईतही कमाल तापमानाची नोंद ३८.६ अंश सेल्सिअस झाली. पुढील दोन दिवस राज्यासाठी तापदायक आहेत. या चार दिवसात तापमान ३८ ते ४० अंशवर जाईल, तर विदर्भात ते ४० पार नोंदविले जाईल, असा अंदाज आहे.

मध्य प्रदेश किंवा लगतच्या परिसरातून उत्तर कोकणात येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईला उष्णतेच्या लाटा तडाखा देत आहेत. मुंबईचे तापमान उच्चांकी म्हणजे ३९ अंश नोंदविण्यात आले. बुधवारी ते ३८ अंशांवर होते. होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा अचानक तापमानात वाढ म्हणजेच उष्णतेची लाट येते. कमाल तापमान सरासरीपेक्षा ४.५ ते ६ अंश जास्त होऊन ते ४० अंशांपर्यंत पोहोचल्यास उष्णतेची लाट मानली जाते. किनारी भागांत ३७ अंश आणि पर्वतीय भागांत ३० अंश सेल्सियसवर उष्णतेच्या लाटेची स्थिती असते. सरासरीपेक्षा ७.४ अंश जास्त तापमान असल्यास उष्णतेची तीव्र लाट असते.
