अकोला दिव्य न्यूज : मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा, शिमगा, या नावाने ओळखली जाते, अपप्रवृत्ती ना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण. खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याचे स्वागता साठी सिद्ध होण्याच हा सण. सृष्टी ही या काळात बदलत असते, वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवी धारण करीत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो. फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या ५–६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. जाणून घेऊया होळी कशी साजरी केली जाते पूजाविधी, इतिहास, महत्व आणि मान्यता…

काही वर्षांपूर्वीपर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायच्या. त्या वेळी दोन होळ्या पेटायच्या. एक छोटी आणि एक मोठी. होळीच्या साधारण पंधरा-वीस दिवस आधी चाकोल्यांसाठी घरातील लहान मुले शेण गोळा करायची. या चाकोल्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे.होळी येईपर्यंत या चाकोल्या खणखणीत वाळलेल्या असायच्या. मग नारळाच्या दोरीत त्या या चाकोल्या ओवून त्याची माळ तयार करायची. एका माळेत साधारण २०-२५ चाकोल्या असायच्या.

आई- बहिणीसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची त्यावेळी मग या चाकोल्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या. दुसऱ्या दिवशी या जळलेल्या पण धग कायम असलेल्या चाकोल्यांवर पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने आंघोळ केली जायची.

होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. पूजेनंतर एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. नवीन धान्याचा अंश जसे, गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांचीही आहुती देण्यात येते.

होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते. होलिका दहन नेहमी भद्रे नंतरच करावे. चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही. सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये. होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो, अशी मान्यता आहे.

पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःलाच देव समजत होता. त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू खेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे. यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधीत झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही, असा एक वर प्राप्त होता. मात्र, भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला.
