अकोला दिव्य न्यूज : जगभरातील क्रिकेट रसिकांची उत्कंठता शेवट पर्यंत ताणून धरणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीच्या महामुकाबल्यात भारतीय क्रिकेट संघाने अखेर चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरले आणि रंगपंचमीच्या ५ दिवसांआधी देशभरात दिवाळी साजरी करण्यात आली. तर भारतासह जगभरातून या सामन्यावर हजारो कोटींची ख्यायवाळी करुन बुकी,पंटर आणि त्यांच्या एजंट यांनीही दिवाळी साजरी केली.आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीने हा सट्टाबाजार संचालित केला होता, अशी माहिती खास सूत्रांकडून पुढे आली आहे.

क्रिकेट जगतासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी चॅम्पियन ट्रॉफी यावेळी कोण जिंकणार याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले होते. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर सट्टा बाजार गरम करून हजारो कोटींची उलाढाल करणारे देश-विदेशातील बुकी या सामन्यांवर कमाईचे साधन म्हणून लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे, पकडले जाण्याचे कोणतेही भय नसल्याने विदर्भातील मोठ्या बुकींसह देश-विदेशातील बुकी दुबईतच बसतात. त्यामुळे बुकींचे माहेरघर म्हणूनही सट्टा बाजारात दुबईची ओळख आहे. काल चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम लढत दुबईतच होती. सूत्रांनुसार, देश-विदेशातील बुकी दुबईत बसून लगवाडी, खायवाडी आणि कटिंगची डावबाजी करीत होती.
उल्लेखनीय म्हणजे, मध्य भारताचा सट्टाबाजार नागपूरचे बुकी संचालित करतात आणि येथील बहुतांश बडे बुकी आपापल्या विश्वासू पंटरसह महिन्यापासून दुबईतच ठाण मांडून बसले होते. तेथूनच विदर्भातील आपल्या पंटर्सकडून खयवाडी करून घेत होते. पश्चिम विदर्भात देखील मोठ्या संख्येने बुकी आणि पंटर असून ग्रामीण भागापर्यंत त्यांचे जाळे तयार करण्यात आले आहेत. कालच्या सामन्यात याभागातून लाख कोटींची उलाढाल झाल्याची चर्चा आहे.
आंतरराष्ट्रीय बुकींकडून सामना सुरु होण्यापूर्वी भारतालाच फेवर होता. त्यामुळे भारताचा ओपनिंग रेट ४० पैसे होता.भारतच जिंकणार, असे तमाम सटोड्यांचेही गणित होते. त्यामुळे एकवेळ भारताचा भाव एक पैसाही झाला होता. मात्र, एकही विकेट न गमावता न्युझिलंडने अर्धशतक गाठल्याने भारताचे भाव गडगडले होते. त्यानंतर तीन फलंदाज गमावल्यानंतर भारताचा भाव कमी झाला होता. नंतर मात्र तो ३० पैशांवर स्थिरावला अन् भारतीय संघाने ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

फलोदी सट्टा बाजाराचं गणित हुकलं : सट्ट्याचे सर्वाधिक अचूक अंदाज वर्तविण्यासाठी फलोदीचा सट्टा बाजार देश-विदेशात ओळखला जातो. यावेळी मात्र फलोदीचा अंदाजही चुकला. कारण फलोदीने यावेळी भारताचा भाव ७० पैसे तर न्यूझीलंडचा भाव ५० पैसे सांगितला होता. अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफी न्युझीलँड जिंकणार, असा फलोदीचा अंदाज होता. तो पुर्णपणे चुकीचा ठरला. त्यामुळे सटोडेच नव्हे तर फलोदी बाजारही बुचकळ्यात पडल्याची स्थिती होती.