अकोला दिव्य न्यूज : विमा क्षेत्रात, विशेषतः जनरल इन्शुरन्स क्षेत्रात, गेल्या पन्नास वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकोला येथील कलंत्री परिवाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे. भारतातील अत्यंत नामांकित HDFC Ergo जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे प्रतीक कलंत्री यांना त्यांच्या उत्कृष्ट व्यवसायाबद्दल भव्यदिव्य सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

सदर सोहळा अझरबैजान देशाच्या बाकू शहरात दिमाखदार पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितिथ प्रतीक कलंत्री यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतीक कलंत्री यांच्या वतीने विशाल गोपालदास कलंत्री यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
विशेष म्हणजे, संपूर्ण भारतभरातील तब्बल १,२०,००० विमा सल्लागारांपैकी केवळ विदर्भातील दोन सल्लागारांची निवड या पुरस्कारासाठी झाली, आणि त्यामध्ये अकोल्याच्या नामांकित कलंत्री परिवाराचे प्रतीक कलंत्री यांचा समावेश होता. त्यांच्या उत्तम व्यवसायिक योगदानामुळे त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली. या सोहळ्यात कंपनीचे नॅशनल हेड सचिन सिंघल व नवजोतसिंह सिद्धू यांनीही कलंत्री परिवाराच्या विमा क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा केली आणि भविष्यातही त्यांनी अशीच उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कलंत्री परिवाराला यापूर्वीही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या आणखी एका प्रतिष्ठित सन्मानामुळे विमा क्षेत्रात तसेच अकोला शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.