अकोला दिव्य न्यूज : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांच्या जवळचे मंत्री असल्याने धनंजय मुंडे वादात अडकले. गेल्या २ महिन्यापासून हे प्रकरण चर्चेत असताना संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाले आणि राज्यात संतापाची लाट उसळली. त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. मात्र आता या प्रकरणानंतर महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री गोत्यात आले आहेत. एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप या मंत्र्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, राज्यातला एक पैलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा, तो विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. हा मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील आहे. १० दिवस जेलची हवा खातो. त्याच्या पलीकडे जाऊन १० हजारांचा दंड भरून न्यायालयात माफी मागतो. त्यानंतरही तो महिलेच्या मागे लागतो. विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल तर यापेक्षा लज्जास्पद, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा काळ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे असा गंभीर आरोप करत त्यांनी केला.
तर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी थेट मंत्र्याचे नाव घेत सरकारला टार्गेट केले. सातारचे जयकुमार गोरे यांच्याबाबत अत्यंत गंभीर, स्वारगेटला जो प्रकार घडला तसाच हा प्रकार आहे. भाजपाचे मंत्री, देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके जयकुमार गोरे यांच्याबाबत हे समोर येतोय. शिवकाळातील सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने छळ आणि विनयभंग केल्याचं समोर आले. ही महिला पुढच्या काही दिवसात विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे.
दरम्यान, संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे, आता हे पात्र नवीन निर्माण झाले आहे. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची झाडाझडती घेतली पाहिजे. कुणाचं नक्की काय आहे हे समोर आले पाहिजे. जयकुमार गोरे यांच्याबाबत जी माहिती समोर आली ती महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे अशी टीकाही संजय राऊतांनी केली. असे विकृत मंत्री महाराष्ट्रात नको.

महाराष्ट्रात असे विकृत मंत्री नको, जर असा मंत्री मंत्रिमंडळात बसत असेल तर त्याला दूर करणे सरकारचं कर्तव्य आहे. चांगली लोक महाराष्ट्रात नाही का, शोधून शोधून एक एक नग मंत्रिमंडळात का भरले जातात असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.