अकोला दिव्य न्यूज : Dhananjay Munde Resignation Ajit Pawar Reacts : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ८० दिवस उलटले आहेत. अद्याप या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला शिक्षा झालेली नाही. दरम्यान, याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. या दोषारोप पत्रातून अनेक खुलासे झाले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड हाच या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचं दोषारोप पत्रात म्हटलं आहे. दुसऱ्या बाजूला सीआयडीच्या दोषारोप पत्रातून या घटनेचे काही फोटो समोर आले आहेत.

काळीज चिरणारे ते फोटो पाहून राज्यभरातून संतापाची लाट उसळली. वाल्मिक कराड व त्याच्या टोळीविरोधात कठोर कारवाई करण्याची, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. दरम्यान, घटनेच्या ८० दिवसांनंतर, देशमुख कुटुंबाच्या संघर्षानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी आज मंगळवार ४ मार्चला त्यांचा राजीनामा दिला आहे. मुंडे यांनी स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी मी तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून आम्ही त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त केलं आहे.

प्रकरण काय? : संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी अद्याप फरार आहे. २७ फेब्रुवारी रोजी, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने बीड जिल्हा न्यायालयात याप्रकरणी तब्बल १,२०० पानांचे दोषारोपपत्र सादर केले. ज्यामध्ये देशमुख यांच्या हत्येचा आणि त्यासंबंधित आणखी दोन गुन्ह्यांच्या प्रकरणांचा समावेश आहे. बीडमधील केज पोलिस ठाण्यात सरपंच देशमुख यांची हत्या, अवादा कंपनीकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अद्याप, याप्रकरणी कोणालाही शिक्षा झालेली नाही.