अकोला दिव्य न्यूज : महायुती सरकारचा शपथविधी झाल्यापासून शिवसेना (शिंदे) आणि भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा आहे. बहुमत असतानाही शपथविधीसाठी लागलेला उशीर आणि त्यानंतर नाशिक-रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून झालेले नाराजी नाट्य, यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचेच चित्र दिसले. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता. महायुतीमधील अंतर्गत राजकारणाचा पुढचा अंक आता पाहायला मिळत आहे. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना एक नवी जबाबदारी दिली आहे.

भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार) ज्या ज्या जिल्ह्यात पालकमंत्री आहेत, त्या त्या जिल्ह्यांसाठी शिवसेनेने संपर्क मंत्री नेमले आहेत. महायुती किंवा आघाडीच्या सरकारमध्ये पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्क मंत्री नेमण्याची पद्धत जुनीच असली तरी एकनाथ शिंदेंनी हा निर्णय घेण्यासाठी जे टायमिंग साधले, त्याची चर्चा आता होताना दिसत आहे. आजच (४ मार्च) राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. तसेच राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदावरही टांगती तलवार आहे.

शिवसेनेच्या एक्स हँडलवर शिवसेनेच्या ११ मंत्र्यांना एकूण २३ जिल्ह्यांची जबाबदारी दिली असल्याची यादी पोस्ट करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पालक मंत्री आहेत. मंत्री उदय सामंत, संजय राठोड यांच्याकडे प्रत्येकी तीन जिल्हे तर आठ मंत्र्यांकडे प्रत्येकी दोन जिल्हे दिले आहेत. तर राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे एकच जिल्हा दिला आहे.विशेष म्हणजे, ५ फेब्रुवारी रोजी भाजपानेही आपल्या संपर्क मंत्र्यांची यादी जाहिर केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनीही आपल्या संपर्क मंत्र्यांची घोषणा केली.

राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये भाजपा आणि शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील नेत्यामध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा असताना एकनाथ शिंदे यांनी १८ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी संवाद साधताना, महायुतीत कोणतंही कुरघोडीचे राजकारण सुरु नसल्याचे स्पष्टीकरण शिंदेंनी दिले होते. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे (एकनाथ शिंदे) संबंध ठंडा ठंडा, कूल कूल आहेत’, अशी मिश्किल प्रतिक्रियाही शिंदेंनी दिली होती आणि महायुतीत अंतर्गत कलहाचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले.