अकोला दिव्य न्यूज : जागतिक मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून सन्मित्र पब्लिक स्कूल येथे जागतिक मराठी राजभाषा दिन मोठ्या हर्ष उल्हासात पार पडला. शाळेच्या प्रांगणात विविध रंगी सुंदर रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या, सर्व विद्यार्थी व शिक्षिका मराठमोळ्या पेहरावामध्ये उपस्थित होत्या. सर्वप्रथम शाळेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत व शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा राजपूत यांचे लेझीमच्या गजरात स्वागत करण्यात आले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरण सादर केली, जसे नृत्य, गीत, कविता सर्वप्रथम आराध्या बहुराशी हिने ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले. वर्ग दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कवयित्री शांता शेळके यांचे कोळीगीत सादर केले ‘वल्हव रे नाखवा’. वर्ग चौथीची विद्यार्थिनी स्वरा देशमुख हिने ‘गायी पाण्यावर का म्हणूनी आल्या’ या कवी बी च्या कवितेवर सुंदर नृत्याद्वारे वडील आपल्या मुलीची कशी समजूत काढतात ते विशद केले. यानंतर वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ या नृत्याचे सादरीकरण केले. यानंतर वर्ग दुसरीची विद्यार्थिनी प्रियल इंगळे हिने कवितेतून सर्वांना चंद्रावरच नेले.

आपली संस्कृती ज्याद्वारे दर्शन होते असे आपले सणवार जसे की गुढीपाडवा, वटपोर्णिमा नागपंचमी, मंगळागौर, पोळा, गणपती, घटस्थापना, दिवाळी, मकर संक्रांति, रंगपंचमी ह्या सणांचे नृत्यातून भंडारा आणि विविध रंगी रंग यांची उधळण करून अतिशय सुंदरपणे सादरीकरण करण्यात आले. सर्व नृत्याचे दिग्दर्शन उषा कराळे, प्राजक्ता उपशाम, श्रावणी मोहोळ टीचर यांनी केले. अशा विविधरंगी सादरीकरणाने शाळेचे वातावरण मराठीमय होऊन गेले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा राजपूत यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्त्व सांगत असताना मराठी भाषा ही सर्वगुण सम्पन्न व समृद्ध भाषा आहे, सर्व कार्यक्रम झाले असे त्यांनी विशद केले.
शाळेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत यांनी, आपली मराठी भाषा व संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याकरीता असे दर्जेदार कार्यक्रम होणे गरजेचे आहे.असे सांगत आपल्या संस्कृतीतून मिळालेले संस्कार हे शाळेमध्ये सुद्धा प्रत्येकाला मिळाले पाहिजे असे विचार त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुरेख संचालन करताना आराध्या बहूराशी हिने जीवनात मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. तर आभार प्रदर्शन वर्ग ४ थीची विद्यार्थिनी माही दामोदर हिने केले. कार्यक्रमाचे आयोजन उषा कराळे व प्राजक्ता उपशाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदाफळे, बोर्डे, कराळे, शर्मा, उपशाम, मोहोड, देशमुख, जांभोरकर शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.