अकोला दिव्य न्यूज : Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य तर भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज, यांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा होतो. यंदा, गुरुवार २० फेब्रुवारी २०२५ रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन येणे शुभ मानले गेले असून, या दिवशी केलेले श्री गुरुंचे नामस्मरण, आराधना, उपासना, मंत्रांचा जप, विशेष पूजन लाभदायक आणि पुण्य फलदायी मानले गेले आहे. राज्यासह देशात आणि परदेशातही गजानन महाराजांचे मठ आहेत. या मठात नित्यनेमाने भाविक जातात आणि महाराजांचे दर्शन घेतात. ‘गण गण गणात बोते’ हा केवळ साधा मंत्र नसून, तो सिद्ध मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ नीट समजून घेतला आणि त्यानंतर त्याचा यथाशक्ती जप केला, तर अधिक चांगल्या पद्धतीने सेवा करता येऊ शकेल.

माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे. ‘गण गण गणात बोते’, हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत. गजानन महाराजांचे लाखो भक्त यथाशक्ती हा मंत्र जपत असतात. या मंत्राचा जयघोष केला जातो. गजानन महाराज यांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले आहे, असे सांगितले जाते. सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे, याची जाणीव लोकांना झाली, तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला. आपली दुःखे, अडचणी सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी या सिद्धपुरुषाला विनवणी केली. तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला, तो म्हणजे ‘गण गण गणात बोते’!
आधी अर्थ जाणून घ्या अन् मगच अखंड जपा ‘गण गण गणात बोते’
गजानन महाराज कोणत्याही घटनेविषयी सांगताना अचूकपणे ओव्या व ऋचा सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत. महाराज अंतर्ज्ञानी होते. त्यांचे बोलणे भरभर, परंतु त्रोटक असे. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वत:मध्ये मग्न राहून ते बोलत असत. अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ‘गण गण गणात बोते’ हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे, असे सांगितले जाते.
आत्मा आणि परमात्म्याची भेट अन् भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी जाणीव
‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला, तर ते समजू शकेल. पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा! प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो केवळ तुमच्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले, तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही. गजानन महाराजांच्या मंत्रानुसार ‘गण गण गणात बोते’ अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे. ही जाणीव हृदयात नित्य होत राहावी आणि भगवंत भेटीची आस लागावी, म्हणून आपणही गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून यथाशक्ती या सिद्ध मंत्राचा जप केल्यास पुण्य मिळू शकते, असे म्हटले जाते.
