अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्यात ज्वलनशील असलेल्या पेट्रोल व डिझेलचा गैरकायदेशीर साठा करुन मोठ्या प्रमाणात राजरोसपणे विक्री सुरू असल्याने परिसरातील नागरिकांची जिवीतहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही अत्यंत गंभीर बाब असल्याने तातडीने कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन वाशिम अकोला पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांना देण्यात आले.यावर तातडीने उचित कार्यवाही करण्यात येईल आणि तातडीने कार्यवाही झाली नाही तर मंत्रालयात भेटीला या, तेथून कारवाई केली जाईल असे आश्वासन ना.भोयर यांनी यावेळी दिले. यासोबतच पदाधिकाऱ्यांनी अकोला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील रीतसर निवेदन देऊन पेट्रोल डिझेलची अवैध विक्री व इंडस्ट्रियल ऑईलच्या अवैध विक्रीवर प्रतिबंध लावून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अकोला जिल्ह्यातील पेट्रोल डिझेलच्या अवैध विक्री सोबत बायो डिझेलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑईलची सर्रासपणे विक्री सुरू आहे. पेट्रोल व डिझेल अत्यंत ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे त्याच्या साठवणूक व विक्रीसाठी विस्फोटक विभागाकडून परवाना घेणे आणि त्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते.परंतु जिल्ह्यात प्रामुख्याने बार्शी टाकळी, पातुर, गायगाव, अकोट फाईल, अकोला एमआयडीसी या भागात ना हरकत प्रमाणपत्र किंवा परवाना न घेता साठवणूक व विक्री सुरू आहे. यामुळे शासनाच्या राजस्वाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर बाबीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होणे आश्चर्यकारक असून समांतरपणे पेट्रोल डिझेल व इंडस्ट्रियल ऑइलच्या अवैध विक्रीमुळे पेट्रोल पंप संचालकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.जर अवैध विक्रीवर प्रतिबंद घालावे अन्यथा जिल्ह्यातील सर्वच विक्रेता आपले परवाने शासनाकडे जमा करून पेट्रोल डिझेलची विक्री बंद करणार अशा आशयाचे पत्र वाशिम अकोला पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनतर्फे अकोला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. या प्रकाराकडे लक्ष देऊन प्रतिबंधात्मक कारवाई त्वरित करण्यात यावी अशी मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.