अकोला दिव्य न्यूज : देशातील सहकार चळवळ बळकट करणे आणि सहकारी संस्था यशस्वी करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा सहकार क्षेत्रातील सर्व संबंधितांना निश्चितच फायदा होईल, यामध्ये शंका नाही. तर 109 वर्षे जुन्या देशातील पहिली अकोला जिल्हा बँकेचा आजगत असलेला निष्कलंक कारभार गौरवास्पद आहे. राज्यातील ढासळलेल्या स्थितीत असलेल्या बॅंकांनी अकोला जिल्हा बॅंकेच्या कार्यपद्धतीचा अवलंब केला तर नक्की फायदा होईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

देशातील सहकार चळवळ बळकट करणे आणि सहकारी संस्था यशस्वी करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत सहकारी संस्थांना स्वावलंबी व सशक्त बनविण्यात येत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष-25 अंतर्गत पंतप्रधानांनी सहकारातून समृद्धीचा नारा देत सहकारात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असे राज्याचे सहकार मंत्री डॉ.पंकज भोयर यांनी अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित कार्यक्रमात सांगितले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त जिल्हा बँकेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषदादा कोरपे व सहकारमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार रणधीर सावरकर, आमदार अँड. किरण सरनाईक, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, आमदार अमित झनक, जिल्हा पणन अधिकारी प्रवीण फडवीस, कृषी उत्पन्न बाजार सभापती शिरीष धोत्रे तसेच बॅंकेचे संचालक उपस्थित होते.

डॉ. भोयर यांनी पुढे सांगितले की, सहकारी संस्थांसाठी सुरू केलेल्या ‘सहकार से समृद्धी’ योजनेंतर्गत कामकाजाची प्रक्रिया सुलभ करणे, बहुराज्यीय सहकारी संस्थांचा विकास बळकट करणे, सहकारी संस्थांचे आधुनिकीकरण करणे आणसंगणकीकरणासोबत सहकारी बँकांमध्ये पारदर्शकता आणणे हे उद्दिष्ट आहे.
यावेळी त्यांनी अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निष्कलंक प्रतिमेचे कौतुक करत आपल्या मतदारसंघातील सहकारी बँकांच्या ढासळलेल्या स्थितीची माहिती दिली. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा फायदा सहकार क्षेत्रातील सर्व संबंधितांना होईल. राज्यमंत्री भोयर म्हणाले की, सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. संस्थांच्या कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी केली आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. चांगल्या कामांसाठी शासन सदैव सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.संतोषदादा कोरपे यांनी प्रास्ताविकात जिल्हा बँकेच्या इतिहासापासून ते सहकारी संस्था व बँक शाखांच्या इतिहासापर्यंत सर्व काही विशद केले. यावेळी त्यांनी सांगितले की, सहकारी संस्थेकडून संगणक मिळाला मात्र तो ठेवण्यासाठी जागा नाही. आम्हाला प्रशासनाकडून केवळ चहावरच खर्च करण्याची परवानगी आहे. त्यामुळे सोसायटीला संगणक ठेवण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करतानाच, सहकार से समृद्धी उपक्रमाबद्दल कोरपे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
कार्यक्रमात आमदार रणधीर सावरकर, आमदार किरण सरनाईक, माजी आमदार सुभाष ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत उकांडे यांनी केले तर संस्थेचे उपाध्यक्ष श्रीधर कानकिरड यांनी आभार मानले.
सोसायटी अध्यक्षांचा गौरव : कार्यक्रमात अकोला, वाशिम जिल्ह्यातील सहकारी संस्था राबवत असलेले विविध उपक्रम व स्तुत्य कार्य पाहून संस्थेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ज्यामध्ये घुंगशी येथील उमाकांत देशमुख, शिवणीचे जगदीश मुरुमकर, मंगरूळपीरचे शालिग्राम राऊत, पुष्पाताई हागे, दत्ता महाले, सुरेश महाडलिक, विनोद ढोरे यांचा सहकार राज्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.