अकोला दिव्य न्यूज : दोन कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या सातवर्षीय मुलाचे कारमध्ये कोंबून अपहरण करण्यात आले. ही घटना शहराच्या गजबजलेल्या वस्तीचा भाग असलेल्या उच्च न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या सिडको एन ४ मध्ये घडली. या घटनेनंतर पोलिसांनी ३० अधिकारी आणि १५० अंमलदारांची पथके स्थापन करून आरोपींना जालना जिल्ह्यातील जाफराबाद परिसरातून ताब्यात घेत मुलाची सुखरूप सुटका केली. ही माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. यावेळी शीलवंत नांदेडकर, प्रशांत स्वामी, नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, गीता बारगडे, संभाजी पवार आदी उपस्थित होते.
या प्रकरणी जालना जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे राहणारे हर्षल पंढरीनाथ शेवत्रे (२१), जीवन नारायण शेवत्रे (२६), प्रणव समाधान शेवत्रे (१९), कृष्णा संतोष पठाडे (२०) आणि जाफराबाद तालुक्यातील आळंद येथील शिवराज उर्फ बंटी गायकवाड (२०) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींवर यापूर्वीचे कुठलेही गुन्हे दाखल नसून केवळ झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गाच्या आमिषाने आरोपीनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील कृष्णा पठाडे हा छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. सर्व आरोपींनी बिहारमधील एका व्यक्तीची मदत घेतल्याचे निष्पन्न होत असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.
पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिडको एन – ४ मधून चैतन्य सुनील तुपे या सात वर्षीय मुलाचे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर बिल्डर असलेले चैतन्यचे वडील सुनील तुपे यांच्याकडे दोन कोटींची मागणी करण्यात आली होती. पोलीस आयुक्तांनी राज्यासह बाहेरील राज्यातील पोलिसांशी संपर्क ठेवून प्रकरणावर संपूर्ण पथक लक्ष ठेवून होते, असे सांगितले.