अकोला दिव्य न्यूज : रामदास पेठ स्थित सन्मित्र पब्लिक स्कूलचे स्नेह संमेलन जल्लोषात साजरे झाले. स्नेहसंमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून अकोल्याचे पोलिस उपअधीक्षक गजानन शेळके, वतपाळ इंडस्ट्रीजचे सीईओ उल्हास वतपाळ, के.व्ही.हनवाडीकर, केशवसिंह वतपाळ,संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत, गोदावरीताई राजपूत आणि सन्मित्र पब्लिक स्कूलच्या प्राचार्या उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या आगमन प्रसंगी गाढे सरांच्या मार्गदर्शनामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.
कार्यक्रमाची सुरुवात व उद्घाटन संस्थेचे व स्कुलचे प्रेरणास्थान हिंदू सूर्य महाराणा प्रताप व सरस्वतीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शुभम नारे व त्यांच्या गीत समूहाने स्वागत गीत सादर केले, त्यानंतर खानझोडे यांनी सर्व पाहुण्यांचा परिचय करून दिल. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या मनिषा राजपूत यांनी शाळेच्या वर्षभरातील शैक्षणिक व अभ्यास पूरक कार्यक्रम तसेच विविध क्रीडा स्पर्धांचा वार्षिक प्रगतीचा अहवाल मांडला.
शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. मागील वर्षी इयत्ता दहावी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या स्वराज मुरूमकार, धृवी सोनी, गौरी चौबे, पियुष नावकार, प्रसन्न कोरपे व आदित्य पांढरकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व चषक देऊन सत्कार करण्यात आला. राज्यस्तरावर वेटलिफ्टिंग, पावर लिफ्टिंग व कॅरम मध्ये प्रतिनिधित्व केलेल्या आयुष मिश्रा,अर्पिता करवते, उज्वल करवते या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे गजानन शेळके यांनी पालकांशी संवाद साधत पालकत्व आज कसे आव्हान ठरत आहे असे प्रतिपादन केले. पालक आणि विद्यार्थी यामधील संवाद आज अत्यंत आवश्यक आहे. पण आपल्या व्यस्ततेमुळे होऊ शकत नाही. मोबाईलचे दुष्परिणाम व त्यावरून भरकटत चाललेला विद्यार्थी यासाठी सध्याचे वातावरण हे पूर्णपणे जबाबदार आहे का याचाही शोध पालकांनी घ्यायला हवा असे सांगितले युवा उद्योजक उल्हास वतपाळ यांनी आवडीच्या क्षेत्रामध्ये आपण कशा प्रकारे प्रगती करू शकतो हे सांगितले. त्यानंतर हंवाडीकर यांनी आपल्या भाषणामधे सांगीतले की जेव्हा तुम्ही शाळा सुरु करतात तेव्हा तुरुंग बंद करतात आणि सन्मित्र शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करीता सतत प्रयत्नशील आहे. संस्थेचे अध्यक्ष राजपूत यांनी संस्था, शिक्षक पालक यांच्या सहकार्यानेच विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपश्याम तर आभार प्रदर्शन नेहा शर्मा यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाला अतिशय उत्साहाने सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या आदिती गावंडे व रिद्धी पवार यांनी केले. यावर्षी स्नेह सम्मेलनची थीम नेव्हर गिव्हअप अशा प्रकारची होती.त्याअनुसरून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लोकनृत्य , देशभक्तीपर गीत , सांस्कृतिक नृत्य, मिमिक्री , एकांकिका इत्यादी कार्यक्रमाचा सहभाग होता. पालकांनी या कार्यक्रमाचा आनंद भरभरून लुटत सन्मित्र पब्लिक स्कूलच्या बाल कलाकारांना प्रोत्साहन दिले. जवळपास बाराशे पालकांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती .या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले.