अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित दोन दिवसीय कव्वाली महोत्सवाचे आज अकोला नगरीत उद्घाटन करण्यात आले.प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्यकर्मी प्राध्यापक मधु जाधव यांचे हस्ते व नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रदीप खाडे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सांस्कृतिक संचालनालय मुंबईचे अधीक्षक वसंतराव खडसे, अकोला जिल्हा सांस्कृतिक संचालनालयाचे समन्वयक सचिन गिरी, सह समन्वयक महेश इंगळे, प्रख्यात कव्वाल गायक राहुल शिंदे, कव्वाल गायिका करिष्मा ताज याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र गीत गाऊन या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. ये देश है संत फकिरो का ही बहारदार कव्वाली राहुल शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रारंभी सादर करून श्रोत्यांच्या टाळ्या घेतल्या. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात करिष्मा ताज व राहुल शिंदे यांनी एकापेक्षा एक सरस कवाल्या सादर करून महोत्सवात रंगत भरली.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री नामदार अँड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात हा कव्वाली महोत्सव राबविण्यात येत आहे. सांस्कृतिक विभागाचे सचिव विकास खारगे व संचालक बिभीषण चवरे या महोत्सवाची संपूर्ण जबाबदारी सांभाळीत आहेत.
दिनांक 4 व 5 फेब्रुवारी 2025 अशा दोन दिवस चालणारा हा कव्वाली महोत्सव दररोज सायंकाळी 6.30 तें 10 या वेळात होणार आहे या काळात अनेक बहारदार कव्वाल्यांचे सादरीकरण करण्यात येईल. आज संपन्न झालेल्या उद्घाटन महोत्सवाचे संचालन सचिन गिरी यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक मधु जाधव, प्रदीप खाडे, किशोर बळी, कपिल रावदेव, विष्णू निंबाळकर, अनिल कुलकर्णी यांच्यासह अनेक श्रोतेमोठ्या संख्येत उपस्थित होते.