अकोला दिव्य न्यूज : anger erupts uponseeing the body : आयुध निर्माणीत शुक्रवारी झालेल्या स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला तर पाच गंभीर जखमी झाले. शनिवारी दुपारी आठही मृतदेह आयुध निर्माणी व्यवस्थापनाने नातेवाइकांच्या ताब्यात देण्यासाठी आणले. संतप्त जमावाने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत मुख्य महाव्यवस्थापक सुनील सप्रे यांना घेराव घालून धक्काबुक्की केली. मात्र, पोलिस संरक्षणामुळे अनुचित घटना टळली.
रुग्णालयातून मृतदेह महाव्यवस्थापकांच्या कार्यालयापुढील मैदानात शेडमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. सकाळपासून साहुली, सावरी, इंदिरानगर, ठाणा व जवाहरनगर आयुध निर्माण वसाहतीमधील हजारो नागरिकांची गर्दी होती. जमावाने घोषणाबाजी केली. मुख्य महाव्यवस्थापक अंत्यदर्शनासाठी पोहोचले. ते परत जात असताना जमावाने त्यांना घेराव करून धक्काबुक्की केली.
पुनर्वसनाच्या मागणीकडे दुर्लक्ष
साहुली गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी २० वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आयुध निर्माणी प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्यात दाखविलेल्या विलंबामुळे जमावाचा रोष वाढला.
हुंदके, गहिवर आणि अश्रूंनी स्मशान थरारले ! हुंदके, गहिवर, अनावर अश्रू आणि आक्रंदन अशा काळीज हेलावणाऱ्या वातावरणाने शनिवारी स्मशानही थरारले. एकाच वेळी आठ जणांचे पार्थिव रांगेत ठेवलेले पाहण्याचे दुर्भाग्य जवाहरनगर आयुध निर्माणीच्या भूमीने अनुभवले. या आठही कामगारांवर शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ध्यानी मनी नसतानाही काळाने चोर पावलाने येऊन घाला घातला. कुणाच्या घरचा लेक गेला, कुणाचे वडील, कुणाचा भाऊ, तर कुणाचे कुंकू पुसले गेले.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रकल्पात कामावर असणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. यावरून कामगार संघटनाही आक्रमक झाल्या. मृतांमध्ये प्रशिक्षणार्थी अंकित भूषण बारई (२०) याचाही समावेश होता. तर प्रशिक्षणार्थी सुनीलकुमार यादव गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे. साहुलीच्या सरपंचांनी जवाहरनगर पोलिसात तक्रार देऊन महाव्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अतिसंवेदनशील विभागामध्ये प्रशिक्षणार्थी व्यक्तीला बळजबरीने कामाला पाठविले जाते, असा कामगार संघटनांचा आरोप आहे.
एक कोटीचे अर्थसाहाय्य : स्फोट आणि मनुष्यहानीच्या चौकशीसाठी केंद्रीय समिती गठित करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी शनिवारी सायंकाळी दिली. तसेच, या घटनेत दगावलेल्यांपैकी स्थायी कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे अर्थसहाय्य आणि १५ दिवसांत नोकरीची हमी यावेळी पालकमंत्री संजय सावकारे यांंनी दिली. मंत्री फुंडकर आणि पालकमंत्री सावकारे यांनी घटनास्थळाची पाहणी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रशिक्षणार्थींना जोखिमीच्या युनिटमध्ये कामासाठी पाठविणे मुळीच योग्य नव्हते. याची चौकशी केली जाईल, असे मंत्री फुंडकर यांनी सांगितले.
मदतीबद्दल पालकमंत्री म्हणाले, सर्व स्थायी कामगारांच्या कुटुंबीयांना जवळपास एक कोटींची मदत दिली जाईल. यात, २५ लाख केंद्र सरकारकडून, ५ लाख मुख्यमंत्री सहायता निधीतून, कामगार नुकसान भरपाई म्हणून १५ लाख, वेतन विमा योजनेतून ४० लाख तसेच नियमानुसार सहापेक्षा अधिक व्यक्तींचा अपघाती मृत्यू होत असल्यास तरतुदीनुसार पाच लाख रुपये आणि अन्य रक्कम असे एक कोटींचे अर्थसहाय्य प्रत्येकी दिले जाईल.
कुटुंबातील एका जणाला नोकरी दिली जाईल.