अकोला दिव्य न्यूज • गजानन सोमाणी : नागरी विकासाचा पाया हा निर्माण व स्थापत्य असून गृहसंकल्पनेच्या दृष्टिकोनातून अशा रचनात्मक उपक्रमांची सातत्याने गरज राहते. रॅम्पकॉन प्रदर्शनीच्या माध्यमातून अशा गरजा पूर्ण होत असून अकोला शहरासाठी ही भूषणावह बाब असल्याचे मत खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केले.
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स अकोला आणि द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात आयोजित तीन दिवसीय रॅम्पकॉन प्रदर्शनीचा आज शनिवारी थाटात प्रारंभ झाला. या सोहळ्यात उद्घाटक म्हणून खा.अनुप धोत्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.रणधीर सावरकर, आ.वसंत खंडेलवाल, आ.साजिदखान पठाण, रुहाटीया गृप ऑफ इंडस्ट्रीजचे सीएमडी शिवप्रकाश रुहाटिया, आयोजन समितीचे अभिजित परांजपे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी सर विश्वसरय्या यांच्या प्रतिमा पूजन करून, दीप प्रज्वलन करीत सोहळ्याला थाटात प्रारंभ केला.
अनेक वर्षापासून अकोला महानगरातील बांधकाम व स्थापत्य विश्वातील बदलत्या घडामोडी आणि नवज्ञान नागरिकांना मिळवून देण्यासाठी सातत्याने रॅम्पकॉन सारखं आयोजित करणाऱ्यांचे कौतुक करीत प्रमुख पाहुण्यांनी महानगराचे पारंपारिक वैभवात भर घालणाऱ्या या प्रदर्शनीची उपयोगिता प्रतिपादीत केली. यावेळी पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे संचालन व आभार आयआयएचे सचिव सर्वेश केला यांनी केले.
प्रदर्शनीतील प्रत्येक स्टॉलची पाहणी करीत बांधकाम, गृह सजावट, साहित्याची माहिती जाणून घेत स्टॉलधारकांशी संवाद साधला. अनेक स्टॉलधारकांनी मान्यवरांचे उस्फूर्त स्वागत केले. दरम्यान रात्री जिल्ह्याचे पालकमंत्री ना.आकाश फुंडकर यांनी प्रदर्शनीस भेट देत आपल्या शुभेच्छा दिल्यात. सोमवार 27 जानेवारी पर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनीला आज पहिल्याच दिवशी नागरिक,व्यवसायिक व उद्योजकांनी एकच गर्दी केली.
प्रदर्शनीच्या स्वागतकर्त्यांनी अनेक मान्यवरांचे आगमन होतं असताना उद्बोधन करून स्वागत केले. संचालन व आभार आयआयएचे सचिव सर्वेश केला यांनी केले.आज दि 26 जानेवारी रोजी प्रदर्शनीतील स. 11 ते साय.5 वाजेपर्यंत ऑडोटोरियम सभागृहात विविध विषयांच्या तज्ज्ञांची मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन असो.ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, अकोला व द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स अकोला यांच्या समस्त पदाधिकारी व सदस्यांनी केले.