अकोला दिव्य न्यूज : Rampcon Exibition 2025 in Akola निरंतर संशोधनाने बांधकाम व स्थापत्यशास्त्रात आश्चर्यकारक बदल आणि नवनवीन तंत्रज्ञानाने प्रगत होत चाललेल्या या क्षेत्राबद्दल सर्वसामान्य माणसाला जागृत करण्याचा उदात्त हेतूने ॲडव्हान्समेंट इन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस इन कंट्रक्शन टेक्नॉलॉजी अर्थात ‘रॅम्पकॉन 2025’ प्रदर्शनीचा आज शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात रंगारंग प्रारंभ होत आहे.
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर,अकोला आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री ना. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित सोहळ्यात केंद्रीय मंत्री ना प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आणि खा.अनुप धोत्रे, आ रणधीर सावरकर, आ.वसंत खंडेलवाल, आ.साजिद खान पठाण, आ.प्रकाश भारसाकळे, आ.हरिष पिंपळे, आ नितीन देशमुख, आ.अमोल मिटकरी, रुहाटिया गृप ऑफ इंडस्ट्रीजचे सीएमडी शिवप्रकाश रुहाटिया यांची उपस्थितीत होणार आहे. यावेळी ज्युनिअर ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
प्रदर्शनीत बांधकाम क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान, साहित्य, डिझाईन, सेवा यांचे शेकडो स्टॉल्स उभारण्यात आले असून सिमेंट, काँक्रीट, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल्स, टाइल्स, हार्डवेअर, फर्निचर, सजावट साहित्य, गृहनिर्माण योजना,फायर फायटिंग सिस्टीम्स, इंटीरियर डिझाईन, क्रॅक रिपेअर तंत्रज्ञान,पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती, वित्तीय व्यवस्थापन समवेत गृहपयोगी विषयाचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच बांधकाम व स्थापत्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे व्याख्यान व चर्चासत्रे होणार असून यातून उद्योजक, कंत्राटदार, अभियंते, आर्किटेक्ट, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम विश्वाचे नवीन ज्ञान मिळणार आहे.
नागरिकांसाठी आजपासून येत्या 27 जानेवारीपर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत निःशुल्क राहणार असून या प्रदर्शनीला सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, अकोला व द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स अकोला यांच्या समस्त पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.