अकोला दिव्य न्यूज : वाढत्या महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बस तसेच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा झटका बसला आहे. एसटीच्या भाडेदरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून १५ टक्के वाढ करण्यात आली असून राज्यभरात रिक्षा व टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपये दरवाढ करण्यात आली आहे. त्यानुसार रिक्षाचे भाडे २६ तर टॅक्सीचे ३१ रुपये असेल. १ फेब्रुवारीपासून नवे दर लागू होतील.
गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून नागरिकांवर विविध सवलतींची खैरात झाली होती. परंतु नवे सरकार स्थापन होताच नागरिकांना दरवाढीचे चटके बसू लागले आहेत. एसटीच्या तिकीट दरात १४.९५ टक्के वाढ करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली होती. ही दरवाढ मध्यरात्रीपासूनच लागू झाली. तर रिक्षा व टॅक्सीच्या भाड्यामध्ये १ फेब्रुवारीपासून वाढ केली जाईल. एसटीची भाडेवाढ यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये, तर रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ सप्टेंबर २०२२ मध्ये करण्यात आली होती.
पेट्रोल, डिझेल तसेच ‘सीएनजी’च्या दरात झालेली वाढ, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर आदी बाबी लक्षात घेऊन दरवाढ करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत दरवाढीला मान्यता देण्यात आली. दरवाढीनंतर रिक्षा व टॅक्सीच्या मीटरमध्ये दर सुधारणा म्हणजेच ‘रिकॅलीब्रेशन’ करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत सुधारणा करून घेणे बंधनकारक असेल. तोपर्यंत अधिकृत दरपत्रक अनुज्ञेय राहिल, असे परिवहन आयुक्तांनी स्पष्ट केले.
एसटीला दररोज तीन कोटी रुपये या प्रमाणात दरमहा ९० कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे भाडेवाढीशिवाय पर्याय नव्हता. एसटीची भाडेवाढ दरवर्षी होणे गरजेचे आहे. – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
दरवाढीचा बोजा
वाहन –. सध्याचे किमान भाडे – नवीन भाडे
एसटी बस – ८.७० रुपये – ११ रुपये
रिक्षा – २३ रुपये – २६ रुपये
साधी टॅक्सी – २८ रुपये – ३१ रुपये
कूलकॅब – ४० रुपये –. ४८ रुपये
१०० ईबस खरेदी
एसटीच्या नवीन ‘बीएस-६’ मानकाच्या नवीन साध्या बस खरेदीला बैठकीत मान्यता मिळाली. पांढऱ्या व हिरव्या रंगाच्या ५० ई-बस तसेच शिवनेरीप्रमाणे १०० ई-बस खरेदी केल्या जाणार आहेत.