अकोला दिव्य न्यूज : गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी महिला व पुरुष किताब, ग्रिको रोमन महाराष्ट्र केसरी इत्यादी विविध वयोगटातील राज्यस्तरीय स्पर्धा अहिल्यानगर येथे २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत होणार आहेत. यासाठी अकोला शहर व जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीने खडकी परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमात विविध वयोगटातील संघ निवडण्यात आयोजित निवड चाचणीस जिल्ह्यातील महिला पुरुष मल्लांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या निवड चाचणीत १२५ किलो गटात सिद्धांत संतोष गवई या मल्लाने बाजी मारली. सिद्धांत गवई हे अहिल्यानगर येथे आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या निवड चाचणीत जिल्हाभरातील विविध वजन गट व गादी व माती प्रकारातील तब्बल १९० मल्लांनी सहभाग घेतला. अकोला जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष चंदू शिरसाट तथा सचिव विदर्भ केसरी युवराज गुलाबराव गावंडे यांच्या नियोजनात संपन्न झालेल्या या निवड चाचणीतून जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला.
यामध्ये राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद स्पर्धेकरिता ५७ किलो वजन गटात जाकीर अब्दुल, ६१ किलो मध्ये अनिकेत शिरसाट, ६२ किलो वजन गटात चैतन्य सरदार, ५७ किलो वजन गटात प्रथमेश घोरे, ७४ किलो वजन गटात शेख बदरुद्दीन शेख रहीम, ७९ किलो वजन गटात राजेश कडू चौधरी, ८६ किलो वजन गटात दीपक बळकार, ९२ किलो वजन गटात शहनाज हुसेन अबरार हुसेन व महाराष्ट्र केसरीसाठी १२५ किलो वजन गटात सिद्धांत संतोष गवई समवेत अनेक महिलांची निवड करण्यात आली.
अहिल्यानगर येथे आयोजित या कुस्ती स्पर्धेत जे मल्ल पदक प्राप्त करतील अशा मल्लांसाठी जिल्हा महानगर कुस्तीगीर संघ सराव शिबिराचे आयोजन करणार असल्याची माहिती यावेळी दिली. या निवड चाचणीत संग्राम गावंडे यांच्या वतीने ट्रॅक सूट उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून देण्यात आले. यावेळी पंच म्हणून अनिल कांबळे, सौरभ खंडारे, भूषण बडदिया, विशाल मिश्रा, कुणाल ठोंबरे, मंगेश अंभोरे, प्रथम डोईफोडे यांनी कामकाज बघितले. आभार विदर्भ केसरी मल्ल युवराज गावंडे यांनी मानले