अकोला दिव्य न्यूज : आता पर्यंत संगीत, शारीरिक शिक्षण, संस्कृत, मातृभाषा, नैतिक शिक्षण, संस्कार व चरित्र निर्माण, बालिका शिक्षण, भारतीय विज्ञान व गणित, पर्यावरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, भारतीय शिक्षणः परंपरा व स्वरूप अश्या विषयांवर ‘संस्कार साधना वार्षिकांक’ प्रकाशित करणाऱ्या विद्या भारती विदर्भ कडून यंदाचा वार्षिकांक ‘सा विद्या या विमुक्तये’ चे प्रकाशन सोहळा उद्या रविवार १९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
अकोला येथील बी आर हायस्कूल येथे सायंकाळी ५.३० वाजता होऊ घातलेल्या प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून डॉ. राम देशमुख अध्यक्ष विद्या भारती विदर्भ तर प्रमुख वक्ते म्हणून विदर्भातील प्रसिध्द वक्ते, विचारवंत, अभ्यासक, अध्ययनशील लेखक डॉ. कुमार शास्त्री, नागपुर उपस्थित राहणार आहेत.
डॉ. कुमार शास्त्री यांचे बी.एस.सी., एम.ए. (अर्थशास्त्र), पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण झाले असून कामठी मधील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातून उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. तरुण भारतच्या ‘आसमंत’ साहित्य पुरवणीचे दहा वर्षे अतिथी संपादक (१९९५-२००५) राहिले आहेत. अनेक वृत्तपत्रात राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अश्या विविध विषयांवर लेखन कार्य ते करीत असतात. त्यांनी आतापर्यंत ख्यातनाम भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, पद्मश्री व्ही शांताराम, पद्मश्री पंडित भीमसेन जोशी, पद्मश्री कुमार गंधर्व, अर्थतज्ञ वि.म.दान्डेकर, पंडित वसंतराव देशपांडे, पद्मश्री किशोरी अमोणकर, शेतकरी नेता शरद जोशी, विद्यावाचास्पती शंकर अभ्यंकर, सिने दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत.
या संस्कार साधना वार्षिक अंक प्रकाशन सोहळ्यास शिक्षण प्रेमी, शाळा संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्गांनी उपस्थित रहावे असे आवाहन विद्या भारतीचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल खारोडे, जिल्हा प्रमुख शरद वाघ, महानगर अध्यक्ष मंगेश वानखडे, महानगर प्रमुख योगेश मल्लेकर यांनी केले आहे.