अकोला दिव्य न्यूज : गाईंचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षणासाठी कार्यरत गोरक्षण संस्थांना आर्थिक मदत करुन देणे, या एकमेव उद्देशाने ‘ओ रामसा’ ग्रुपकडून सादरीकरण करण्यात येणाऱ्या ‘श्री.रामदेव जीवन लीला’ या महानाट्याचा पहिल्याच प्रयोगाला उपस्थित हजारो भाविक भक्तांसह रसिकांच्या उस्फूर्त प्रतिसादाने मराठवाड्यात ‘श्री रामदेवबाबा जीवन लीला’ चा गजर होतोय ! आजपर्यंत महाराष्ट्राच्या विविध शहरात प्रस्तुत करण्यात आलेल्या महानाट्यातून ४५ लाख रुपयांचा निधी वेगवेगळ्या गोरक्षण संस्थांना देण्यात आला आहे. अकोला येथील लेखक व गायक सुनील नावंदर निर्मीत ‘ श्री.रामदेव जीवन लीला’ या महानाट्याचा १९ वा प्रयोग जवळपास ३ हजारांहून अधिक भाविक भक्तांच्या साक्षिने नुकताच छत्रपती संभाजी नगर येथे पार पडला. संभाजीनगर येथील भाजपा राजस्थान प्रकोष्ठ आणि राजस्थानी महिला प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने सागर लॉन येथे घेण्यात आला.
यावेळी राजस्थानी समाजाचे आराध्य श्री रामदेव बाबा यांचे जीवन व चरित्राचे नृत्यनाट्याद्वारे वर्णन करण्यात आले.या कार्यक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. कार्यक्रमात रामदेव बाबांची जन्मकथा, बाल लीला, विवाह उत्सव, बाबांचे पत्रके अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. श्री रामदेवबाबा यांच्या लग्नानिमित्त काढण्यात आलेली वरात सर्वांचेच आकर्षण ठरली. बाबांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. या नृत्यनाट्यात अकोला येथील ४० आणि छत्रपती संभाजीनगर येथील ८५ असे एकूण १२५ कलाकारांनी नृत्य व अभिनयाने सादरीकरण केले. कार्यक्रमात उपस्थित भाविकांनी सढळ हाताने मंगरुळ येथील केशव गोरक्षण संस्थांसाठी १ लाख ११ हजार रुपयांचा मदत निधी दिला.
मुख्य नाट्यगृहाशेजारी असलेल्या दुसऱ्या एका मंचावर रामदेवबाबा यांची मोठी मूर्ती आणि अखंड ज्योत सुरू होती. भक्तांनी रांगेतून बाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला आणि कार्यक्रमानंतर सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्प प्रमुख सोमनाथ तांबी, आनंद वर्मा, दिनेश दरख, नरेश मोर, लक्ष्मी गुप्ता, रश्मी खंडेलवाल, दिपाली बडजाते, संगीता शर्मा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए नंदकिशोर मालपाणी आणि रश्मी खंडेलवाल यांनी केले.