अकोला दिव्य न्यूज : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ अकोला शहरात सोमवार 20 जानेवारी 2025 रोजी विविध राजकीय व सामाजिक संघटनांतर्फे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणात दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणी करिता मोर्चा काढण्यात येणार आहे.
सर्वपक्षीय व सर्व धर्मीय जनतेचा सहभाग असणारा हा जन आक्रोश मोर्चा 20 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता अशोक वाटिका परिसरातून निघून नियोजित मार्गांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल. अतिशय शांततापूर्ण वातावरणात निघणाऱ्या या मोर्चात समाजातील सर्व जाती-धर्माच्या बंधू भगिनींनी, युवक युवतींनी मोठ्या संख्येत सहभागी होऊन आपला निषेध व्यक्त करावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
जन आक्रोश मोर्चाचे पूर्व तयारी करिता राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक सभा नुकतीच संपन्न झाली. त्यात प्रामुख्याने विनायकराव पवार, राजेश मिश्रा, राजेश पाटील, अशोक पटोकार, विजय बोरकर प्रशांत जानोळकर, मंगेश काळे, पंकज जायले, राम मुळे, प्रदीप चोरे, योगेश थोरात, मुरलीधर राऊत, संतोष दाभाडे, सचिन पालकर, युवराज भागवत, शौकत अली, गजानन कांबळे, गजानन हरणे, राजेश देशमुख, दिलीप देशमुख, साहेबराव काळंके यांचे सह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.