अकोला दिव्य न्यूज : lakhoba lokhande arrested for robbing 25 women with the lure of marriage. एकीकडे मुली मिळत नसल्याने लग्न रखडलेल्या तरुणांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे शादी डॉट कॉमच्या माध्यमातून एकाने २५ हून जास्त महिलांना गंडा घातला आहे. लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणारा पुण्याचा लखोबा लोखंडे उर्फ फिरोज निजाम शेख (३२) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली. त्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
शादी डॉट कॉमच्या माध्यमातून महिलांना जाळ्यात अडकवणारा फिरोज निजाम शेख हा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गंगावळण, कळाशी येथील रहिवासी असून सध्या तो पुण्यातीलच कोंढवा येथे वास्तव्यास आहे. सगळ्यात आधी कोल्हापूर येथील एका महिलेची फसवणूक केली आणि त्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने या लखोबा लोखंडेने अटक होईस्तोवर २५ महिलेची फसवणूक केली.
घटस्फोटित विधवा महिलांना लक्ष्य
शहरातील एका घटस्फोटित महिलेने शादी डॉट कॉमवर नाव नोंदणी केली होती. त्यावरून तिचा मोबाइल नंबर मिळवून फिरोज शेख नावाच्या तरुणाने लग्न करण्याची तयारी दर्शवली. महिलेच्या घरी येऊन त्याने इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितले. त्यानंतर ओळख वाढवून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून एक लाख ६९ हजार रुपयांची रोकड आणि आठ लाख २५ हजारांचे दागिने उकळले.
लग्नाचा तगादा सुरू होताच त्याने ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगत महिलेला टाळण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने १० जानेवारीला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कोल्हापूरच्या पोलिस पथकाने पुण्यातील कोंढवा येथून संशयिताला अटक केली. त्याचे एक लग्न झाले असून, कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत.
२५ महिलांना लुबाडले
शेख याने २५ महिलांना गंडा घातल्याचे चौकशीत समोर आले. यातील काही महिलांकडून त्याने लाखो रुपये उकळले आहेत. यापूर्वी त्याच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, काही ठिकाणी तक्रार अर्ज आहेत.
crime / lakhoba lokhande arrested for robbing 25 women with the lure of marriage