अकोला दिव्य न्यूज : Beed Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad judicial custody Mcoca : बीड जिल्ह्यातील केज न्यायालयाने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत मोठा निर्णय दिला आहे. वाल्मिक कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. याबरोबर कराडची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
खंडणी प्रकरणाबाबत वाल्मिक कराड याला आज १४ जानेवारीला बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयात सरकारी वकिलांनी वाल्मिकची सीआयडी कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातही वाल्मिक कराड प्रमुख आरोपी आहे. या हत्या प्रकरणाचे पुरावे गोळा करण्याचं काम देखील दुसऱ्या बाजूला चालू आहे.
सीआयडीने खंडणी प्रकरण व संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिकची चौकशी करण्यासाठी त्याची सीआयडी कोठडी मागितली होती. मात्र, न्यायमूर्तींनी न्यायालयीन कोठडी दिली आहे. खंडणी प्रकरणात त्याची अजून १४ दिवस चौकशी केली जाईल.
अखेर वाल्मिक कराडवर ‘मकोका’ कारवाई
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड प्रमुख आरोपी असल्याचा दावा विरोधी पक्षांमधील नेते व मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने देखील कराडवर आरोप केले आहेत. त्यामुळे कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी विरोधक करत होते. या हत्या प्रकरणात आतापर्यंत इतर आठ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र, वाल्मिकवर मकोका लावण्यात आला नव्हता. त्याच्यावरही मकोका लावण्यात यावा अशी मागणी होत होती. नागरिकांची ही मागणी आता पूर्ण झाली आहे. वाल्मिक कराडवर आता मकोका लावण्यात आला आहे.
वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे. त्यानेच देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा विरोधी पक्षांमधील नेते करत आहेत. पोलिसांनी देखील त्याच दिशेने त्यांचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करायचा आहे. तसेच वाल्मिकची चौकशी करायची आहे. त्यामुळे या हत्याकांड प्रकरणाचा तपास करण्यासाठीच सीआयडीला त्याची कोठडी हवी होती.