अकोला दिव्य न्यूज : भागवत कथा सकल जगाच्या कल्याणासाठी असून यामध्ये चराचर सृष्टीचे हित संपूर्णपणे जोपासण्यात आले आहे. मानव जातीच्या कल्याणाचा या भागवतात विचार करण्यात आला आहे. भक्तांचे कल्याण सर्वोपरी हे ब्रीद घेऊन भागवतची वाटचाल सकल जगाच्या कल्याणासाठी हजारो वर्षापासून सुरू आहे. भागवत श्रवणाने भगवंताची प्राप्ती होते. भगवंता प्रति आसक्ती निर्माण होते. भगवंताच्या प्रेमात जो राहील तो आजन्म प्रसन्नचित्त राहुन जगाच्या कल्याणाचा विचार करेल. म्हणून अशा हितकारक भागवतची भक्तांनी कास धरून जीवन कृतार्थ करावे, असा हितोपदेश जयपूर येथील भागवतकार राधाकृष्ण महाराज यांनी केला.
स्थानीय मुंगीलाल बाजोरीया विद्यालयाच्या प्रांगणातील गोकुळ धाम येथे सुरू असलेल्या भागवत कथेत आज व्दितीय पुष्प गुंफताना राधाकृष्ण महाराज म्हणाले, भगवंताला प्रेमाने जिंकता येते. भगवंताचे प्रेम हे सत्कर्मात परावर्तित होते. सत्कर्माचे फळ वाढवायचे असेल तर भगवंताच्या नामाचे स्मरण करणे आवश्यक आहे. भगवंताच्या केवळ नावानेच वस्तूची वृद्धी होते.त्याच्या नावाने दिल्या जाणाऱ्या साहित्यात कोणत्याच प्रकारची कमतरता व निकड न भासता उलट त्यामध्ये वृद्धी होते. म्हणून अशा नफ्याचा विचार करता भगवंत स्मरण हे जीवनाचा नफा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भगवान प्राप्तीसाठी अनेक जण उपवास, व्रतवैकल्य करतात. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे होय.याचा अर्थ भगवंताजवळ निराहार राहणे आहे. मात्र आपण उपवासात निरनिराळे पदार्थ खाऊन आळसाला जन्म देतो. म्हणून अशा खाण्यापिण्याच्या उपवासाला वर्ज्य करण्याचा हितोपदेश त्यांनी दिला. ते म्हणाले, शरीरात आहार चक्र आहे. आहार चक्र हे पंधरा दिवसात एक वर्तुळ पूर्ण करते. जर आपण पंधरा दिवसात एक दिवस उपवासाचे व्रत अंगीकारले तर देहाची शुद्धी होऊन आपण ताजेतवाने होऊन नवी ऊर्जा आपल्या अंगी निर्माण होऊ शकते. म्हणून एक दिवस उपवास धरून या दिवसापासून दर पंधरा दिवसाला उपवास करून मन व तन शुद्ध करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले,भगवंताच्या नामस्मरनाने पुण्य प्राप्त होते. वास्तविक भगवंताला पुण्याची काही गरज भासत नाही. जे कार्य भगवंताला प्रसन्न करण्यासाठी केले तर उलट भगवंतच आपणास त्या कार्यात वृद्धी करून त्या कार्याचा वेळू गगनावर नेल्याशिवाय राहणार नसल्याचे यावेळी सांगितले. मंगलाचरणने सत्र प्रारंभ करण्यात आले..यावेळी अनेक भक्तांनी महाराजांचे स्वागत केले.
कथा परिसरात तुलादान मोठ्या प्रमाणात सुरू असून 15 जानेवारी पर्यंत दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित राधाकृष्ण महाराज यांची भागवत कथा व रात्री 7-30 ते रात्री 10 पर्यंत आयोजित राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचा भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पच्या वतीने व सर्व सनातनी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरात महाराजांची प्रभात फेरी सुरू : उद्या बिर्ला मंदिर राधाकृष्ण महाराज यांची प्रभात फेरी भक्तांच्या वतीने सुरू झाली असून त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्थानीय गोरक्षण रोड परिसरातून सकाळी 6 वाजता प्रभात फेरी सुरू झाली. गौरक्षण संस्थान येथून भगवंताचा जयघोष करीत खंडेलवाल भवन समोरच्या मंदिरात पोहचली. राधाकृष्ण महाराज यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने महिला पुरुष या प्रभात फेरीत सहभागी होते.
हभप संतोष महाराज पिसे यांचा विठ्ठल नाम जप
विठ्ठल परिवार अकोला चे मार्गदर्शक हभप संतोष महाराज पिसे यांचा विठ्ठल नाम जप सोहळा कथा प्रांगणात संपन्न झाला. विठ्ठल नामाच्या अखंड नाम जपाने परिसर ढवळून निघाला. यावेळी शेकडो महिला, पुरुष विठ्ठल भक्त या सामूहिक नाम जपात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.