Thursday, January 9, 2025
HomeUncategorizedपहिल्याच दिवशी कथामंडप फुलला ! भक्तीमय वातावरणात राधाकृष्ण महाराजांची भागवत कथा प्रारंभ

पहिल्याच दिवशी कथामंडप फुलला ! भक्तीमय वातावरणात राधाकृष्ण महाराजांची भागवत कथा प्रारंभ

*उद्या सकाळी गोरक्षण संस्थानं येथून निघणार प्रभात फेरी * *पहिल्याच दिवशी कथामंडप महिलांसह भाविकांनी फुलला* अकोला दिव्य न्यूज : गजानन सोमाणी : संपूर्ण जगात आज दररोज कोट्यवधी लोक आपल्या व्यवहारात पैशाची प्रत्यक्ष देवाण घेवाण करीत नाही.पण परस्परांच्या बॅक खात्यात पैसे जमा होतात ना ! तसेच भगवत नाम स्मरण आणि भागवत श्लोकातून मिळणारे पुण्य फळ दिसणार नाही. परंतु तुमच्या कर्म खात्यात ते निश्चितच जमा होणारच, फक्त विश्वास गरजेचा आहे, असं प्रतिपादन गोवत्स श्री राधाकृष्ण महाराज यांनी केले.
अकोल्यात आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पतर्फे सर्व सनातनी समाजाच्या सहकार्याने आयोजित आणि मुंगीलाल बाजोरीया विद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या गोकुळ धाम येथे आज गुरुवार ९ जानेवारीपासून श्री राधाकृष्ण महाराज यांच्या अमृतमय वाणीत श्रीमद्भगवद्गीता कथेला प्रारंभ झाला. प्रथम सत्रात भागवत कथा श्रवण आणि भागवतमधिल श्लोकांचे विवेचन करताना महाराज बोलत होते.

कथा प्रारंभ होण्यापूर्वी कथा परिसरातील हनुमान मंदिरापासून राधाकृष्ण महाराज यांची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत मुख्य यजमान अनिल चांडक व कुटुंबाने भागवत ग्रंथ मस्तकावर धारण केले होते.शोभायात्रेत समितीचे सर्व पदाधिकारी महिला पुरुष भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रा गोकुळ धाम येथे पोहचल्यावर कथा मंडपातील व्यासपिठावर विराजमान होऊन राधाकृष्ण महाराजांनी संगीतमय मंगलाचरण गाऊन श्रीमद्भगवद्गीता कथेला प्रारंभ केला.

भागवत कथा मधिल श्लोकांचा उहापोह करताना त्यांनी पुढे सांगितले की, ही भूमी देवाला अत्याधिक प्रिय आहे. कारण या भूतलावरच भगवंताची सेवा व पूजा करण्याचे भाग्य प्राप्त होऊ शकते.भगवंत येथे भक्तांची भाजी, भाकरी खाऊन तृप्त होतात. यामुळे स्वर्गालाही या भुलोकाचा हेवा वाटतो. स्वर्गात सुख, सुविधेचा सर्वत्र सुकाळ असताना ही देवांना या भूतलाचं स्मरण होते. कारण देवांना भगवंतप्राप्ती स्वर्गात होऊ शकत नाही. मात्र भूतलावर मानवाला सातत्याने भगवंताकडे घेऊन जाण्याचे कार्य संत करीत असतात.संतांच्या जागरणामुळेच भूमाता पवित्र व पुलकित होत असून हे सर्व स्वर्गात घडत नसल्याचे पू.राधाकृष्ण महाराज यांनी यावेळी स्पष्ट केले.

मकर संक्रांतीला दान दक्षिणेला फार महत्त्व असून उत्तरायणात रामायण, भागवतची पूजा करून दान देवून प्रभू भक्तीत रममाण व्हावे. मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य देवाचे उत्तरायण सुरू होते. ‘उत्तर’ चा अर्थ जलतत्त्व आणि ”नयण’ म्हणजे निवास, म्हणजे जलतत्वात ज्याचा निवास आहे असा तो नारायण आहे. वास्तविक जलामध्ये (पाण्यात) अनेक जलचर राहतात.पण यामध्ये नारायण केवळ श्रीहरी आहे. यासाठीच मकर संक्रांतीचा पर्व हा भगवंत प्राप्तीचा काळ असून या पर्वात भगवंताचे स्मरण हा शाश्वत प्रभू प्राप्तीचा मार्ग आहे. असा हितोपदेश गोवत्स राधाकृष्ण महाराज यांनी केला.

आपल्या प्रथम सत्रात राधाकृष्ण महाराज यांनी भागवतची महत्ता विशद केली. भागवत महात्ममुळे कथेत रूची वाढते. भगवंताप्रति आसक्ती निर्माण होते. ही आसक्ती भगवंत प्राप्तीच्या मार्गाकडे भक्ताला घेऊन जाते. दर दिवशी भागवतमधिल अर्धा तरी का होईना श्लोक वाचला, श्रवण केला, तर हजार गो-दानचे पुण्य प्राप्त होते. गोपी गीताचे श्रवण करणे ही पण भगवंताचे सार आहे.पुण्याचे महत्व साक्षात तुकाराम महाराजांनी ही कथन केले आहे.

कृष्णाय वासुदेवाय देवकीनंदनायच , नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमो’ हा मंत्र सातत्याने म्हटले तर दुःखांचा अंत होतो. ज्या घरात पती-पत्नी हे भगवंताची सेवा, स्मरण करतात, त्यांच्या घरी भगवंत सदा वास करतात. वैष्णवांची परिभाषा अनेक आहे.मात्र त्यापैकी ज्याच्या घरी भागवत विराजमान आहे,तो वैष्णव आहे, ज्याचा घरातील सर्वजण वैष्णव होण्याची इच्छा करीत असतात, अशा घरात भगवंताचे निवास राहते. मात्र भगवंत तेथे एकटे नव्हे तर आपल्या पत्नी समवेत निवास करीत असतात. म्हणून भागवतचे श्रवण करताना घरातही भागवत अत्यावश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी दैनिक यजमान विनोद तोष्णीवाल, आयोजन समितीचे मार्गदर्शक रमेश चांडक, आयोजन समितीचे स्वागताध्यक्ष अँड.आशिष बाहेती, डॉ राजीव बियाणी, रवी चांडक, राजेश जैन आदींनी महाराजांचे स्वागत केले.

कथा परिसरात तुलादान सोहळा मोठ्या भक्तीभावात सुरू होता. कथा परिसरात आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने आरोग्य परीक्षण तथा सहयोग ग्रुपच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण, यमुना महिला मंडळाची ताक वितरण सेवा आदी उपक्रम सुरू आहे.दिनांक 15 जानेवारी पर्यंत नित्य दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित राधाकृष्ण महाराज यांची भागवत कथा व रात्री 7-30 ते रात्री 10 पर्यंत होणा-या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचा भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प व सर्व सनातनी समाजाने केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!