अकोला दिव्य न्यूज : मागिल काही दिवसापासून बीड पोलीस राज्यभरात चर्चेत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड पोलिसांवर राज्यभरातून टीका सुरू आहेत. दरम्यान, आता बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनंत मारोती इंगळे असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
इंगळे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अजूनही समोर आलेले नाही. बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणी वाल्मीक कराड याला सीआयडीने ताब्यात घेतले असून १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. कराड केज पोलीस ठाण्यात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
वाल्मीक कराड याच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप
वाल्मीक कराड याने पवनचक्की कंपनीकडे दोन कोटी खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, वाल्मीक कराड याचे व्हाइस सॅम्पल बुधवारी घेतले जाणार आहेत. तसेच दुसरा आरोपी विष्णू चाटे याच्या घराची झडतीही घेतली जाणार आहे. त्याचा मोबाइल जप्त करण्यासाठी सीआयडीकडून तपास सुरू आहे.
केज तालुक्यातील मस्साजाेग येथील पवणचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी केज ठाण्यात वाल्मीक कराडसह विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील चाटेला अटक केली होती, तर कराड हा शरण आला आहे. घुले हा सध्या सरंपच संतोष देशमुखह हत्या प्रकरणात आरोपी आहे. मंगळवारी चाटेला न्यायालयात हजर केले होते. त्याने मोबाइल दिला नाही. तसेच तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगत सीआयडीने त्याची पोलिस कोठडी घेतली होती. जवळपास २० दिवसांपासून चाटे हा सीआयडीच्या कोठडीत आहे, तर कराडदेखील सध्या अटकेत आहे. परंतु, तपासात काय उघड झाले, हे मात्र सीआयडीकडून सांगितले जात नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
beed police officer end life-by-hanging-himself-at-police-headquarters-in-beed