अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरालगत हिंगणा रोड भागातील महिला मार्निग वॉक करित असताना त्या महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना आज मंगळवार ७ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडल्याने परिसर व पोलिस विभागात एकच खळबळ उडाली.नवीन वर्षाचा आज सातवा दिवस असून नवीन वर्षाला हत्येचा घटनेने सलामी दिली. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून आपल्या आईला चापट मारल्याचा राग मनात धरून मुलाने महिलेची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
अकोल्यातील जुना हिंगणा येथील सविता ताथोड या पहाटे सहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक करिता गेल्या असता, घराच्या काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर मोटारसायकलवरून आलेल्या युवकाने अचानक समोर येऊन सविता ताथोड यांना अडवून त्यांचा गळा आवळला आणि खाली पाडले. अचानक झालेल्या या प्रकराने त्या घाबरून गेल्या. मात्र सोबत असलेली महील आणि तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ताथोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने ताथोड यांचं डोकं रस्त्यावर आपटून त्यांना रक्तबंबाळ केलं. काही वेळातच सविता ताथोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने येथून पळ काढला.
महिलेची हत्या करण्यात आल्याची वार्ता ऐकून एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविता विजय ताथोड आणि त्यांचा मारेकरी धिरज जुमडे यांची आई यांच्यात दोन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद होऊन हाणामारी झाली होती. या गोष्टीचा राग मनात धरून धिरज जुमडेने आज सविता ताथोड यांची हत्या केली.