अकोला दिव्य न्यूज : महानगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या मालमत्ता करासह इतर विविध कर वसुलीसाठी खाजगी कंपनीला दिलेला कंत्राट रद्द केला आहे. सर्वात अगोदर हा कंत्राट रद्द व्हावा यासाठी विविध प्रकारचे आंदोलन करणाऱ्या निलेश देव यांचे कौतुकासह आभार व्यक्त होत असताना, नागरिकांच्या मालमत्ता करावरील दंड (शास्ती) माफ करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे संघटक निलेश देव यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदन द्वारे आहे.
शहरातील नागरिकांकडून मालमत्ता करासह इतर विविध करांची वसुली खाजगी कंपनीच्या माध्यमातून करण्याची पद्धत महाराष्ट्रात कोठेही नाही. मात्र या कर वसुलीसाठी खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आला होता. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे संघटक निलेश देव यांनी सर्वप्रथम आवाज उठवून या निर्णयाला विरोध केला होता. या निर्णयाविरोधात त्यांनी शहरात स्वाक्षरी अभियान राबविले.
या अभियानात शहरातील एक लाखाच्या वर नागरिकांनी स्वाक्षरी करून कर वसुलीच्या कंत्राटीकरणाला विरोध दर्शविला होता. त्यानंतर निलेश देव यांनी अकोला शहरातील कर वसुलीच्या खाजगी कंत्राटविरोधात मुंबईत उपोषण केले. पाच दिवसांच्या उपोषणानंतर राज्य शासनाकडून त्यांना हा कंत्राट रद्द करण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. शहरातील नागरिकांकडून विविध कर वसूल करण्यासाठी खाजगी कंपनीला दिलेला कंत्राट व या कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने होत असलेली कर वसुली या विरोधात निलेश देव यांनी अकोल्यात पुन्हा अन्नत्याग आंदोलन केले होते.
या आंदोलनाचे देखील लाखो अकोलेकरांनी कौतुक केले. निलेश देव यांच्या या सर्व आंदोलनानंतर अखेर महानगरपालिकेने शहरातील विविध कर वसुलीसाठी खाजगी कंपनीला दिलेला कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील लाखो नागरिकांकडून निलेश देव यांचे कौतुक होत असून आभार व्यक्त केले जात आहेत.
आता महानगरपालिकेच्या मालमत्ता करासह विविध करांची वसुली महानगरपालिकेचे कर्मचारी करणार आहेत. नागरिक कर भरणा करण्यासाठी तयार आहेत. परंतु कर वसुलीसाठी खाजगी कंपनीला कंत्राट देण्याच्या महापालिकेच्या चुकीच्या निर्णयामुळे व या खाजगी कंपनीच्या कर वसुलीच्या चुकीच्या पद्धतीमुळे नागरिकांना कर भरण्यास विलंब झालेला आहे. त्यामुळे मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्यात यावी, अशी मागणी निलेश देव यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केलेली आहे. महानगरपालिका आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे समस्त अकोलेकरांचे लक्ष लागलेले आहे.