Welcome 2025! Happy New Year : अकोला दिव्य न्यूज: सरत्या वर्षाला निरोप देऊन आज संपूर्ण जग नव्या वर्षात प्रवेश करणार आहे. दरवर्षीप्रमाणे नव्या वर्षाचे म्हणजेच २०२५ या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वांनी प्लॅनिंग केले आहे. त्यापैकी जगातील सर्वप्रथम न्यूझीलंड या देशाने नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. भौगोलिकदृष्ट्या सर्वात आधी दिवस सुरु होणाऱ्या न्यूझीलंडमधील ऑकलंड या शहरात नवीन वर्षाचे जंगी स्वागत करण्यात आले.
फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ३१ डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्री घड्याळात १२ वाजताच, न्यूझीलंडच्या लोकांनी नवीन वर्षाचे भव्य स्वागत केले आणि २०२५ मध्ये प्रवेश करणारा जगातील पहिला देश म्हणून साऱ्यांना सकारात्मक ऊर्जा दिली.
ऑकलंड, न्यूझीलंडमधील सर्वात मोठे शहर असून त्याच्या आयकॉनिक स्काय टॉवर येथे फटाक्यांची तुफान आतषबाजी करण्यात आले. नेत्रदीपक रोषणाई आणि दिव्यांच्या आतषबाजीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आकाश रंगीबेरंगी रंगांनी उजळून निघाले असताना हजारो लोकांनी नववर्षाचे स्वागत करत साऱ्यांना शुभेच्छा दिल्या.