Saturday, January 4, 2025
HomeUncategorizedहिंगोलीचा इंजिनिअर इराणमध्ये बेपत्ता ! कुटुंबासोबत २४ दिवसांपासून संपर्क नाही

हिंगोलीचा इंजिनिअर इराणमध्ये बेपत्ता ! कुटुंबासोबत २४ दिवसांपासून संपर्क नाही

अकोला दिव्य न्यूज : एका कंपनीची माहिती घेण्यासाठी इराणला गेलेला मूळ हिंगोली जिल्ह्यातील अभियंता हा मागील २४ दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पतीचा संपर्क तुटल्याने पत्नीसह कुटुंबियांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे पतीच्या शोधासाठी पत्नीने राजकीय नेत्यांसह पोलिसांकडे धाव घेतली आहे. योगेश उत्तमराव पांचाळ असं अभियंताचं नाव आहे.

कंपनीची माहिती घेण्यासाठी इराणमध्ये गेलेले योगेश पांचाळ हे मूळ हिंगोली जिल्ह्यातील वसमत कारखाना रोड येथील रहिवासी आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते आपल्या पत्नीसह नांदेड येथील सिडको भागात सासरवाडीत राहतात. काही दिवसांपूर्वीच योगेश यांनी श्रीयोग एक्सपोर्ट नावाने नवीन कंपनीची नोंदणी केली होती. कंपनीच्या माध्यमातून एक्सपोर्ट-इम्पोर्टचा व्यवसाय करण्याचा त्यांचा उद्देश होता. याच अनुषंगाने त्यांनी इराण येथील सादिक यांच्या कंपनीची माहिती घेतली. प्रत्यक्षात कंपनीची माहिती घेण्यासाठी योगेश यांनी १५ दिवसांचा व्हिसा काढला होता.

७ डिसेंबरपासून योगेश यांच्याशी संपर्क नाही
योगेश पांचाळ हे मुंबईहून ५ डिसेंबर रोजी इराणला गेले. या दौऱ्यादरम्यान ते तेहराणमधील बहारेस्तान हेरिटेज या हॉटेलमध्ये थांबले होते. दौऱ्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ कॉलवरून सादीक याच्याशी संपर्कही केला होता, असा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे. दरम्यान इराणला पोहचल्यानंतर योगेश यांनी पत्नी आणि लहान मुलाशी संपर्क केला. मात्र त्यानंतर ७ डिसेंबर पासून त्यांचा संपर्कच झाला नसल्याचं त्यांच्या पत्नीने सांगितलं.

११ डिसेंबरला परतीचा प्रवास, पण विमानात बसलेच नाही
विशेष म्हणजे योगेश यांचा ११ डिसेंबर रोजी परतीचा प्रवास होता, मात्र त्या दिवशी योगेश हे विमानात बसलेच नाही, असं चौकशी दरम्यान सांगण्यात आलं. २४ दिवसांपासून संपर्क होत नसल्याने कुटुंबियाची चिंता वाढली आहे. या प्रकरणी योगेश यांच्या पत्नीने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली आहे. दरम्यान पतीच्या शोधासाठी पत्नीने शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. शिवाय खासदार अशोक चव्हाण, अजित गोपछडे आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची भेट घेऊन पतीच्या शोधाची विनंती केली आहे.

अशोक चव्हाणांनी घेतली इराण दुतावास अधिकाऱ्यांची भेट
योगेश पांचाळ हे इराणमध्ये बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी आज मंगळवारी मुंबईतील इराणचे कॉन्सुलेट जनरल हसन मोहसिनेफार्द यांची भेट घेतली.

इराणी दुतावासात जाऊन मोहिसनेफार्द यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, गेल्या ५ डिसेंबरपासून योगेश पांचाळ बेपत्ता असून, त्यांचे कुटुंबिय प्रचंड तणावात आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी इराणमधील संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहेत. मात्र, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.

इराण सरकार आणि तपास यंत्रणांशी समन्वय साधून योगेश पांचाळ यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी विनंती चव्हाण यांनी त्यांना केली. दुसरीकडे खासदार अजित गोपछडे आणि वसमतचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांनी देखील शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!