अकोला दिव्य न्यूज : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकाचे बक्षिस पटकवित अकोला शहर व जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रासह इतरही सर्वच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असल्याबद्दल प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे यांना अकोला भूषण पुरस्कार देऊन त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी संचालिका वंदनाताई नारे यांचा गौरव करण्यात आला.
भारताचे पहिले कृषीमंत्री तथा शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवानिमित्त नेहरू पार्कचे संचालक बी.एस.देशमुख व संचालिका इंदुताई देशमुख यांनी आयोजित केलेल्या कार्यगौरव व पुरस्कार वितरणाचा सोहळ्याच्या प्रारंभी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन व प्रख्यात सिने दिग्दर्शक शाम बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कुंभार यांच्याहस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व तत्कालीन कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याचे पूजन करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कुंभार यांनी एकमेव प्रभात किड्स स्कुलचे संचालक डॉ. गजानन नारे यांना अकोला भूषण पुरस्कार प्रदान करुन कार्यक्रमातून रजा घेतली.
पुरस्कार वितरण सोहळ्यात रद्दी संकलनातून मिळालेल्या पैशातून गोरगरिबांची दिवाळी साजरी करणारे पुरुषोत्तम शिंदे, पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल संपादक रवी टाले, मुकबधीर विद्यार्थ्यांच्या संगोपनाबद्दल सुचिता बनसोड, गोरगरिबांच्या वैद्यकीय सेवेबद्दल डॉक्टर शफिक अहमद, कृषी तंत्रज्ञानाबद्दल अभिजीत ठाकरे, नाट्य व साहित्य क्षेत्रातील कामगिरी बद्दल प्राध्यापक रावसाहेब काळे, पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीबद्दल शरद कोकाटे व आपातकालीन संकटातील कार्याबद्दल दीपक सदाफळे यांना समाज वीर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
अभिनय क्षेत्रात राज्यस्तरीय रौप्यपदक मिळवून तसेच विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल बालकलाकार धनश्री पांडे व विश्वास करंडक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून कलर वाहिनीवरील इंद्रायणी मालिकेतील प्रमुख भूमिकेबद्दल राघव निलेश गाडगे यांना बाल वीर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
बॉक्सिंग स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावरील यशाबद्दल कनक खंडारे, नाट्य व अभिनय क्षेत्रातील कामगिरीबद्दल काजल राऊत, सुरसंगीत स्पर्धेत महागायकाचा पुरस्कार मिळविल्याबद्दल गोपाल गावंडे तसेच ब्रँड ॲम्बेसिडर रोहन बुंदेले यांना युवा वीर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. वैद्यकीय सेवेतील तसेच कोरोना काळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल संजय बाबुराव देशमुख व कृषी क्षेत्रातील कामगिरी बद्दल दिलीपराव देशमुख यांना जीवन गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला.
प्रास्ताविकात प्रा. मधु जाधव यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद केला. कार्यक्रमाचे संचालन धनंजय मिश्रा तर प्रशांत गावंडे यांनी मानपत्राचे वाचन केले. मानपत्राचे लेखन प्रदीप खाडे तर प्रभजित सिंग बछेर यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास माजी आमदार संजय गावंडे, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर,अविनाश पाटील,अंबादास मानकर,विजय कौसल, बाजीराव वझे, सचिन बुरघाटे, मनोहर हरणे, मधुकरराव देशमुख, पुष्पा गुलवाडे, मनीष खर्चे, संजय सूर्यवंशी, गजानन हरणे, अँड. सुभाषसिंग ठाकूर, राम मुळे, प्रशांत जाणोरकर, डॉ. विजय जाधव, समाधान जगताप, रवी अरबट, अनिल माहोरे, नीरज आवंडेकर, अक्षय राऊत, मोहन खडसे, जयेश जग्गड, रहमान खान, कुणाल देशमुख, अश्विनी देशमुख, डॉ.सीमा तायडे, अशोक पटोकार, बाळ काळणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.