Saturday, December 28, 2024
HomeUncategorizedDr. Manmohan Singh Funeral : आज डॉ. सिंग यांना निरोप ; शासकीय...

Dr. Manmohan Singh Funeral : आज डॉ. सिंग यांना निरोप ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अकोला दिव्य न्यूज : India Ex Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral : भारतीय अर्थव्यवस्थेला उदारीकरणाची दिशा दाखवून विकासाच्या वाटेवर नेणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व’ अशा भावनांनिशी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना देशातील विविध क्षेत्रांतून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून शुक्रवारी आदरांजली वाहण्यात आली. डॉ. सिंग यांच्यावर आज, शनिवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास दिल्लीतील निगमबोध घाट येथे लष्करी तसेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिंग यांच्या निधनाचा शोक म्हणून १ जानेवारीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयांसह दूतावासांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे सरकारने जाहीर केले आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार, केंद्रीय अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान अशी महत्त्वाची पदे भूषवताना भारताच्या सर्वसमावेशक आर्थिक विकासालाच ध्येयस्थानी ठेवणारे डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव गुरुवारी मध्यरात्रीनंतर निवासस्थानी आणले गेले. डॉ. सिंग यांची मुलगी अमेरिकेतून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भारतात येणार असल्याने अंत्यसंस्कारासाठी शनिवारची वेळ निवडण्यात आली. दिल्लीतील निगमबोध घाट येथे सकाळी पावणेबाराच्या सुमारास डॉ. सिंग यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८ ते ९.३० या वेळेत डॉ. सिंग यांचे पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे अध्यक्ष खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांतील नेतेमंडळींनी तसेच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुक्रवारी डॉ. सिंग यांच्या मोतीलाल नेहरू रोड येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यापासून गेल्या दहा वर्षांपासून डॉ. सिंग यांचे येथेच वास्तव्य होते.

डॉ. सिंग यांचे जीवन आदर्शवत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एका ध्वनिचित्र संदेशाद्वारे डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली. ‘प्रतिकुल परिस्थितीत असंख्य अडथळे पार करून यशाच्या शिखरावर कसे पोहोचता येते, याचा उत्तम परिपाठ असलेला डॉ. सिंग यांचा जीवनपट येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्शवत असेल’, असे मोदी म्हणाले. ‘पंतप्रधान म्हणून डॉ. सिंग यांचे देशाच्या विकास आणि प्रगतीतील योगदान कायम स्मरणात राहील, असे मोदी यांनी या संदेशात म्हटले आहे.

मंत्रिमंडळात शोकप्रस्ताव
डॉ. सिंग यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून शुक्रवारी सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डॉ. सिंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शोकप्रस्ताव संमत करण्यात आला व त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती भवन, संसद भवन आदी संविधानिक व सरकारी ठिकाणांवरील तसेच, काँग्रेसच्या मुख्यालयातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला. येत्या १ जानेवारीपर्यंत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार असून भारतीय दूतावासांनाही तशाच सूचना देण्यात आल्या आहेत. सिंग यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने सर्व केंद्रीय आस्थापनांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!