अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भात शैक्षणिक गुणवत्तेचा मापदंड जपत शिक्षण आरोग्य, सेवा क्षेत्रात जनमानसात स्थान निर्माण करणारी संस्था म्हणजे समर्थ एज्युकेशन संस्था होय, असे प्रतिपादन संस्थेच्या वार्षिक उत्सवादरम्यान आरोग्यतज्ञ डॉ .दीपक मोरे यांनी केले. श्री समर्थ ग्रुप एज्युकेशन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले.यामध्ये समर्थ पब्लिक स्कूल शाखा,रणपिसे नगर, रिधोरा रोड ,गोरक्षण रोड,समर्थ कोचिंग क्लासेस आणि समर्थ नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
तीन दिवसीय वार्षिकोत्सव-२०२४ मध्ये संस्थाध्यक्ष प्रा.नितीन बाठे यांच्या मातोश्री श्रीमती सुमनताई बाठे यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. अस्तित्व, धरोहर या थीमच्या माध्यमातून मातृत्व सन्मान, संस्कृती संवर्धनासह, शिवराज्याभिषेक सोहळा हा स्नेहसंमेलनाचा अतूट धागा होता. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या माहीतीपटाचे सादरीकरण व रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लोगोचे प्रकाशन करण्यात आले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी अप्रतिम कलाविष्कार सादर केले.वर्षभरात वेगवेगळ्या क्षेत्रात शैक्षणिक प्रगती केलेल्या तसेच सांस्कृतिक,क्रिडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
संगीत रजनी आणि शिव राज्याभिषेककाचे विहंगम सादरीकरण झाले. सोबत बीएस्सी नर्सिंगच्या तसेच जी.एन.एम च्या विद्यार्थाचा लॅम्प लाईटींग व शपथविधी सोहळा विशेष आकर्षण ठरला .या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य,अभिनयाचे सादरीकरण करुन पालक व उपस्थितांची मने जिंकली.वर्षभरात वेगवेगळ्या क्षेत्रात आणि शैक्षणिक प्रगती केलेल्या हरहुन्नरी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.तब्बल ११ एकर परिसरामध्ये दिव्यांच्या रोषणाईत झालेले संमेलन डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले, असे गौरवोद्गार उपस्थित पालक व श्रोत्यांनी काढले.
प्रत्येक सत्राचे सूत्रसंचालन नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिमरित्या करून वेगळीच छाप पाडली.संगीत रजनीत विद्यार्थी गायक कलाकारांनी गायिलेली सुमधूर गाणी व वाजविलेली विविध वाद्ये या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्ये ठरले. कार्यक्रमाच्या अंतिम चरणात ‘जाणता राजा’च्या धर्तीवर ‘संपूर्ण स्वराज्य’हे ऐतिहासिक मराठी महानाट्य सादर करुन सर्वांच्या अंगावर रोमांच उभे केले. घोडे,पालखी, हुबेहुब पात्र संयोजन या सर्व गोष्टींनी संगीत-संवादमय नाट्यांनी सर्वांचे मन जिंकून गेले.
विद्यार्थी प्रमुख समृध्दी बाठे व अभिजित गुप्ता यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त केले. श्री समर्थ एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांनी २५ वर्ष म्हणजे संघटन शक्तीचा परिपाक असल्याचे सांगितले.यावेळी संचालिका प्रा.जयश्री बाठे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक राजेश बाठे, प्रा.किशोर कोरपे, प्रा.किशोर रत्नपारखी, प्रा.योगेश जोशी, एज्युकेशनल संचालक प्रा.डाॅ.जी.सी.राव, तसेच तिन्ही शाळेच्या प्राचार्य सुवर्णा गुप्ता, अश्विनी थानवी, मुग्धा कळमकर, उपप्राचार्य प्रेमेंद्र पळसपगार तसेच नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदीनहरी, उपप्राचार्य पी.सीमा, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .